’15 मिनिटांचं एकच उत्तर 100 टक्के…’, ओवैसींच्या 15 मिनिटांच्या वक्तव्यावरून संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी अन् खळबळ
GH News November 12, 2024 07:15 PM

पंधरा मिनिटांचं एकच उत्तर शंभर टक्के मतदान असा आशय असलेले एक बॅनर छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघात लावण्यात आलं आहे. हे बॅनर झळकवण्यात आल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघात अज्ञात व्यक्तीकडून हे बॅनर लावण्यात आलं आहे. २०१२ मध्ये १२ वर्षांपूर्वी एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी पंधरा मिनिटांच्या संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांची काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये एक सभा पार पडली. या सभेत देखील त्यांनी त्या पंधरा मिनिटांचा उल्लेख केल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र आता छत्रपती संभाजीनगरमध्ये हे बॅनर लावण्यात आल्याने चर्चांना तोंड फुटलं आहे. या बॅनरवर पंधरा मिनिटांचं एकच उत्तर शंभर टक्के मतदान असा मजकूर असून यातील पंधरा मिनिटांचं एकच उत्तर हे हिरव्या रंगात छापण्यात आले आहेत, तर शंभर टक्के मतदान हे भगव्या रंगात छापण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघात एमआयएमकडून इम्तियाज जलील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर भाजपकडून अतूल सावे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता नेमका कोणता उमेदवार विजयी होणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.