नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांची १३ नोव्हेंबर रोजी जाहीर सभा होणार आहे. यासंदर्भात माध्यमांच्या प्रतिनिधींनी नारायण राणेंना सवाल केला असता त्यांनी मिश्किल भाष्य करत थेट आव्हान केलं आहे. ‘उद्धव ठाकरे १३ तारखेला सभा घेणार तर माझी साडे १३ तारखेला सभा आहे. त्यांनी सभा घेतली की मी शंभर टक्के सभा घेणार आणि अपशब्द वापरल्यास हेलिकॉप्टरने जायचं नाही उद्धव ठाकरेंनी बाय रोड जाऊन दाखवावं’, असं आव्हानच नारायण राणेंनी दिलं. दरम्यान, नारायण राणेंच्या आव्हानावर ठाकरे गटाचा आमदार वैभव नाईक यांनी पलटवार केलाय. ‘सिंधुदुर्गात आल्यावर नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंचा ताफा अडवून दाखवावाच’, असा इशारा वैभव नाईक यांनी दिला आहे. नारायण राणे यांनी दिलेल्या या आव्हानानंतर वैभव नाईक यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तर नारायण राणे आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यातील वादाचा फायदा महाविकास आघाडीला होईल या निवडणुकीत तिन्ही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील असा विश्वासही वैभव नाईक यांनी केला आहे.