Uddhav Thackeray Bag Check: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडींना वेग आला आहे. नेत्यांचे दौरे, प्रचार, सभा, रॅली मोठ्या प्रमाणावर काढल्या जात आहेत. अशातच विधानसभेच्या दौऱ्यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची (सोमवारी) वणी येथे हेलीपॅडवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी केली होती, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर काल (मंगळवारी) पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली आहे. वणीनंतर औसामध्ये उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली. त्यानंतर राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया समोर येत आहेत, त्यावरती भाजपकडून उत्तर देण्यात आलं आहे.
काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच असते म्हणत भाजपचा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगची देखील तपासणी झाली. पण, त्यांनी ना कोणता व्हिडिओ काढला, ना कोणती आगपाखड केली असं म्हणत भाजप पक्षाकडून ठाकरेंवर टीका केली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगचीही तपासणी झाल्याचा व्हिडिओ भाजपकडून ट्विट करण्यात आला आहे. 5 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर विमानतळावर देवेंद्र फडणवीस यांच्या बॅग्जची तपासणी करण्यात आली होती. भाजप पक्षाकडून याबाबची व्हिडिओ आपल्या सोशल मिडिया एक्स (पुर्वीचे ट्विटर) अकाऊंटवरून शेअर केला आहे.
जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच असते!
हा व्हीडिओ पहा, 7 नोव्हेंबरला यवतमाळ जिल्ह्यात आमचे नेते मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या बॅगची तपासणी झाली. पण, त्यांनी ना कोणता व्हीडिओ काढला, ना कोणती आगपाखड केली. तत्पूर्वी, 5 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर विमानतळावर सुद्धा मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या बॅग्जची तपासणी झाली. (हा तो 5 नोव्हेंबरचा व्हिडिओ) दिखाव्यासाठी केवळ संविधान हाती घेऊन चालत नाही, तर संवैधानिक व्यवस्थाही पाळाव्या लागतात. संविधानाचे भान प्रत्येकाला असलेच पाहिजे, एवढीच आमची विनंती आहे.
जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच असते!
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 13, 2024
हा व्हीडिओ पहा, 7 नोव्हेंबरला यवतमाळ जिल्ह्यात आमचे नेते मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या बॅगची तपासणी झाली. पण, त्यांनी ना कोणता व्हीडिओ काढला, ना कोणती आगपाखड केली. तत्पूर्वी, 5 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर विमानतळावर सुद्धा मा.… pic.twitter.com/ebkuigJE2E
राज ठाकरे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, उद्धव ठाकरेंची आज निवडणूक आयोगाच्या लोकांनी बॅग तपासली. परवा पण असंच झालं होतं. निवडणूक कर्मचाऱ्यांना कळत नाही. त्या बॅगमध्ये काय भेटणार. ज्यांच्या हातातून कधी पैसे निघाले नाहीत त्यांच्या हातातून आणखीन काय निघणार. फार फार तर रुमाल आणि कोमट पाणी...असा टोला राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लगावला. आमची बॅग तपासली, आमची बॅग तपासली करताय, अरे आमच्या पण बॅग तपासल्या आहेत. अरे येवढा काय तमाशा करताय, अशी खोचक टीका देखील राज ठाकरेंनी यावेळी बोलताना केली आहे.