दुष्काळातील आर्थिक संकटात सापडलेला पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ साखर कारखाना अखेर सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात बोलत असताना स्वतः पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये असलेल्या जाहीर सभेतून कारखान्याबाबत गुड न्यूज दिली. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे महायुतीच्या उमेदवार नमिता मुंदडा यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या आयोजित सभेमध्ये पंकजा मुंडे यांनी ही घोषणा केली आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी वैद्यनाथ साखर कारखान्याची उभारणी केली. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर कारखान्याचे सूत्र पंकजा मुंडे यांनी हाती घेतले होते. मात्र मध्यंतरी दुष्काळादरम्यान आर्थिक संकटात वैद्यनाथ साखर कारखाना सापडला आणि हा कारखाना बंद होता. परंतु अखेर हा वैद्यनाथ साखर कारखाना पुन्हा सुरू होणार असल्याची आनंदाची बातमी पंकजा मुंडे यांनी दिली आहे. येत्या 14 तारखेला वैद्यनाथ साखर कारखाना सुरु होणार आहे आणि 25 तारखेला मोळी टाकण्याचं काम होणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या उसाची काळजी करू नये, असे देखील पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.