अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांच्यामध्ये शुक्रवारी महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं होतं. अमेरिकेतील अलस्कात दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तीन तास बैठक झाली. अमेरिकेच्या राजकीय विश्लेषकांच्या मते या बैठकीमुळे भारताला मोठा फायदा होऊ शकतो. रशियाकडून भारत तेल खरेदी करतो, म्हणून ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावला आहे, मात्र पुतिन यांच्यासोबत झालेल्या या बैठकीनंतर भारतावर टाकला जाणार दबाव आता कमी होण्याची शक्यता आहे.
नॉर्थ कॅरोलविना विद्यापीठाचे प्राध्यापक क्लॉस लारेस यांनी या भेटीवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, या भेटीमुळे भविष्यात भारतावरील निर्बंधांचा प्रभाव कमी होऊ शकतो.पुढे बोलताना त्यांनी असं देखील म्हटलं आहे की,’पुतिन यांना आशा होती की एकतर निर्बंध लागू केले जाणार नाहीत किंवा ते अधिकृतपणे उठवले जातील, जर ट्रम्प यांनी भारत आणि चीनवरील निर्बंध उठवले तर ते पुन्हा दुसऱ्या पद्धतीनं निर्बंध घालण्याची शक्यता फारच कमी आहे.
भारत या बैठकीतून जे परिणाम समोर आले आहेत, ते पाहून सध्या तरी समाधान व्यक्त करू शकतो. तुम्ही तुमच्या पातळीवर एखाद्या देशावर निर्बंध घालू शकता, मात्र तुम्ही जगाला हे कसं सागू शकता की तुम्ही रशियाकडून तेल खरेदी करू नका म्हणून? भारतानं ट्रम्प यांच्या या इशाऱ्याकडे आणि टॅरिफच्या धमकीकडे दुर्लक्ष केल्याचं दिसत आहे, असंही लारेस यांनी यावेळी म्हटलं.
डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन यांच्या या भेटीमुळे अमेरिका आणि रशियामध्ये बंद असलेले आर्थिक संबंध पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास युरोपीयन यूनियनकडून लागू करण्यात आलेली निर्बंध प्रणाली कमकुवत ठरू शकते. जर अमेरिकेनं रशियासोबत सामान्य आर्थिक आणि व्यापारी संबंध सुरू करण्याचा निर्णय घेतला तर त्याचा अप्रत्यक्ष फायदा हा भारताला देखील होईल असं भाकीत क्लॅस यांनी यावेळी वर्तवलेलं आहे.