भिरा परिसरात मुसळधार पाऊस
अंबा, कुंडलिका नद्यांना पुराचा इशारा; भिरा धरणातून विसर्ग सुरू
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १६ : भिरा, पाटणूस परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांची पातळी झपाट्याने वाढत आहे. शनिवारी (ता. १६) सकाळी ११ वाजताच्या सुमारास अंबा आणि कुंडलिका नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधतेचा इशारा देण्यात आला आहे. भिरा जलविद्युत केंद्रात पाण्याची पातळी ९४.५८ मीटर इतकी वाढली आहे. त्यामुळे धरणाचे एक ते तीन क्रमांकाचे दरवाजे उघडून तब्बल ६२.४० घनमीटर प्रति सेकंदाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती कोलाड पाटबंधारे विभागाने दिली.
विसर्गामुळे कुंडलिका नदीच्या पात्रात पाणीपातळी आणखी वाढून पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भिरा, पाटणूस परिसरात गेल्या २४ तासांत (सकाळी ११ वाजेपर्यंत) ५८.२० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
घाटमाथ्यावरही जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे अंबा आणि कुंडलिका नद्यांची पातळी सातत्याने वाढत आहे. संकटकालीन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली असून आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नदीपात्राजवळील नागरिकांना इशारा
गोपाळकालाच्या पार्श्वभूमीवर अनेक तरुण नदीत पोहण्यासाठी जातात; मात्र सध्या नद्यांचे पात्र धोकादायक स्थितीत असल्याने कोणत्याही परिस्थितीत नदीत उतरणे टाळावे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.