टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान हे 2 कट्ट्रर प्रतिस्पर्धी काही महिन्यांपूर्वी झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत आमनेसामने होते. भारताने नेहमीप्रमाणे हा सामना जिंकत विजयी परंपरा कायम ठेवली होती. त्यानंतर आता पारपंरिक प्रतिस्पर्धी आशिया कप 2025 स्पर्धेनिमित्ताने भिडणार आहेत. आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. मात्र सर्वांचं लक्ष हे भारत-पाकिस्तान या सामन्याकडे लागून आहे. उभयसंघातील हा हायव्होल्टेज सामना 14 सप्टेंबरला होणार आहे. मात्र गेल्या काही सामन्यांमध्ये पाकिस्तानची निराशाजनक कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे पाकिस्तानला आतापासूनच आशिया कप स्पर्धेची भीती आहे. पाकिस्तानने या भीतीपोटी आशिया कप स्पर्धेआधी सरावासाठी खास प्लान केला आहे.
रेव्हस्पोर्ट्सच्या रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तान क्रिकेट टीम दुबईतील आयसीसी अकादमीत 22 ऑगस्टपासून सरावाला सुरुवात करणार आहे. पाकिस्तानच्या कामगिरीवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना हा निर्णय घेण्यात आला आहे.
पाकिस्तानची गेल्या काही सामन्यांपासून निराशाजनक कामगिरी राहिली आहे. पाकिस्तानने 2025 वर्षात आतापर्यंत एकूण 11 एकदिवसीय सामने खेळला आहे. पाकिस्तानला 11 पैकी फक्त 2 सामन्यांमध्येच विजय मिळवता आला आहे. इतकंच नाही तर पाकिस्तानला बांगलादेश विरुद्ध टी 20I मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यानंतर पाकिस्तानने विंडीज विरुद्ध टी 20I मालिका जिंकली होती. मात्र विंडीजने पाकिस्तानचा वनडे सीरिजमध्ये धुव्वा उडवत पराभवाची परतफेड केली होती.
आशिया कपआधी पाकिस्तान, यूएई आणि अफगाणिस्तान यांच्यात ट्राय सीरिज होणार आहे. या मालिकेला 29 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी पाकिस्तान यूएईमध्ये सराव करणार आहे. यामुळे पाकिस्तानला यूएईच्या खेळपट्टीची माहिती होईल. तसेच आशिया कप स्पर्धेआधी थोड्याफार प्रमाणात सराव होईल. आशिया कप स्पर्धेचं आयोजनही यूएईमध्ये करण्यात आलं आहे.
पाकिस्तान ट्राय सीरिजमधील आपल्या पहिल्या सामन्यात 29 ऑगस्टला अफगाणिस्तान विरुद्ध भिडणार आहे. तर पाकिस्तानसमोर 30 ऑगस्टला यजमान यूएईचं आव्हान असणार आहे. तर तिसऱ्या सामन्यात 2 सप्टेंबरला पु्न्हा अफगाणिस्तानचं आव्हान असणार आहे. पाकिस्तान या मालिकेतील आपला चौथा सामना 4 सप्टेंबरला यूएई विरुद्ध खेळणार आहे. तर या मालिकेतील अंतिम सामना हा 7 सप्टेंबरला होणार आहे.
दरम्यान या ट्राय सीरिजनंतर 9 सप्टेंबरपासून आशिया कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील एकूण 8 संघांना 4-4 नुसार 2 गटांमध्ये विभागण्यात आलं आहे. पाकिस्तानचा ए ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. ए ग्रुपमध्ये पाकिस्तानसह ओमान, यूएई आणि टीम इंडियाचा समावेश आहे.