नागपूर - चांदीवाल आयोगाने ‘क्लीन चिट’ हा शब्द त्यांच्या चौकशी अहवालात वापरला नसला तरी मला दोषी धरले नाही. मात्र, भाजप वारंवार मी दोषी असल्याचे सांगून दिशाभूल करीत असल्याचा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला.
चांदीवाल आयोगाचा अहवाल एक हजार ४०० पानांचा आहे. तो जनतेसमोर आणावा यासाठी मी वारंवार मागणी महायुती सरकारकडे केली. त्याकरीता न्यायालयासुद्धा गेलो असल्याचे देशमुख यांनी सांगितले. ‘निवृत्त न्यायाधीश चांदीवाल यांनी माझ्यावरील आरोपाची अकरा महिने चौकशी केली. त्यांनी अनेकांचे जबाव नोंदविले.
चांदीवाल आयोगाच्या अहवालात मी कोठेही दोषी असल्याचे दर्शविण्यात आले नाही. माझ्यावर लावण्यात आलेल्या आरोपांचे पुरावे त्यांना मिळाले नाही. ज्या परमबीर सिंग यांना सहा वेळा समन्स काढून चौकशीसाठी बोलावण्यात आले होते ते अटक वॉरंट काढण्यात आल्यानंतर उपस्थित झाले. त्यांनीसुद्धा कुठलेच पुरावे दिले नाहीत. केवळ ऐकीव माहितीच्या आधारावर अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्याचे त्यांनी आयोगाला सांगितले,’ असे देशमुख म्हणाले.
निवडणुकीसाठी राजकारण
सचिन वाझे याने आयोगासमोर जबाबात आपण कधीही बार मालकाकडून पैसे गोळा करण्यासाठी सांगितले नसल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. मुंबई उच्च न्यायालयात माझ्यावरील आरोपांचा खटला सात महिने चालला. उच्च न्यायालयानेही पुरावे नसल्याचे सांगून मी दोषी दिसत नसल्याचे म्हटले असल्याचे सांगत सध्या पुन्हा हा विषय उकरून काढला जात आहे. निवडणुकीसाठी भाजप राजकारण करीत असल्याचे देशमुख म्हणाले.