ढिंग टांग : तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण…?
esakal November 15, 2024 12:45 PM

निवडणुकीनंतर महाराष्ट्राचा नवा कारभारी कोण होईल, हे अजून गुलदस्त्यात असून मतदारांना त्याबद्दल विलक्षण उत्सुकता आहे, असे माध्यमांचे ठाम मत आहे. कारभारीपदासाठीच सारे काही चालू आहे, यात शंका नाही; परंतु, मराठी जनतेला त्यात फारसे स्वारस्य असेल, असे आम्हाला वाटत नाही.

कारण ‘तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण?’ हा प्रश्न आडून आडून विचारत आम्ही गपचूप एक सर्व्हे उरकला. हल्ली हे सर्व्हे प्रकरण सर्वीकडे दिसू लागले आहे. राजकीय पक्ष तर दुखल्या-खुपल्याला (याऐवजी आम्हाला दुसरे काही शब्द सुचले होते, पण ते पचनाशी संबंधित असल्यामुळे त्यास वेगळाच वास येण्याची शक्यता असल्याने टाळत आहो!!) सर्व्हे करतात.

असाच एकप्रश्नी सर्व्हे आम्ही केला. त्यातून आम्हाला वेगवेगळी उत्तरे मिळाली. आम्ही मतदारांना जसा हा प्रश्न विचारला, तसाच तो राजकीय पक्षांच्या (निवडक) पुढाऱ्यांनाही विचारला. पुढाऱ्यांनी ‘मीच’ हे उत्तर वेगवेगळ्या पद्धतीने दिले, तर मतदारांनी ‘कोणी का होईना, सगळे एका माळेचे मणी’ हे उत्तर विविध हातवारे आणि ओठांच्या भेदक हालचाली करुन दिले. या पाहणीतील काही मासलेवाईक उत्तरे येथे देत आहो :

एकच प्रश्न : तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण?

कर्मवीर भाईसाहेब : माझ्या मनावर काय आहे? महाशक्तीच्या जे मनात, तेच माझ्या मनात!! तुम्ही महाशक्तीला विचारा, आणि ते काय सांगतात, ते मला येऊन कानात सांगा!

फडणवीसनाना : गेल्या वेळी मी प्रचंड त्याग केला. इतका की त्याग करुन करुन मी वैत्यागलो!! पण सब्र का फल मीठा असं कुणीतरी म्हटलंय. माझ्या मनातली खुर्ची रिकामीच आहे, २०२९ मध्ये आपण स्वबळावर कारभार करु असं मला माननीय मोटाभाईंनी समजावलंय. मी ओके म्हटलंय! पण यावेळी अडीच वर्ष तरी मला मिळायला काय हरकत आहे? मी पुन्हा येईन!

दादासाहेब बारामतीकर : दरवेळी मी ‘उप’वर राहातो. उपमुख्यमंत्रीपदावरच गाडं अडतं, पुढं जाता जाईना! यावेळी सहा महिने तरी मिळावेत. माझ्या मनातला मुख्यमंत्री मीच होतो, आहे आणि यापुढेही राहीन! मनात काय ठरवावं, याचा अधिकार लोकशाहीनं ज्याला त्याला दिला आहे.

उधोजीसाहेब : मनातला मुख्यमंत्री म्हणजे काय असतं, आँ? मी आजी, माजी आणि भावी मुख्यमंत्रीच आहे. किंबहुना अवघ्या महाराष्ट्राच्या मनातला मुख्यमंत्री मीच आहे, होय! तरी सांगत होतो, चेहरा निवडा, चेहरा निवडा! ऐकलं नाही!!

बाळासाहेब जोरात : (संकोचाने काळवंडून) हायकमांडने संमती दिली तर सहमतीचा उमेदवार म्हणून मला मनातला मुख्यमंत्री केलं तरी चालेल!

जयंत्रावजी पाटील : छे, भलतंच!

राजेसाहेब ठाकरे : यावेळी अनपेक्षित निकाल लागणार! कूऽऽक…झुक झुक…झुझुक!

विनोदवीर तावडे : (रोखून बघत) तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण? हा प्रश्न आहे की टोमणा? यावेळी चर्चेतल्या नावांपेक्षा वेगळंच नाव पुढे येण्याची शक्यता आहे, दरवेळी तीच तीच नावं तुमच्या मनात येतात तरी कशी? मध्यप्रदेश आणि राजस्थानमधला फॉर्म्युला महाराष्ट्रात वापरला गेला तर मी तुम्हाला प्रत्येकाला चहा आणि फरसाणाचं पाकिट देईन!!

प्रातिनिधिक मतदार : कोणी का हुईना, आपल्याला काय त्याचं? आमच्या मनात मुख्यमंत्री वगैरे असतो, हे थोतांड तुम्हाला सांगतं कोण? हिते दातावर मारायला नाही पैका, आणि मुख्यमंत्रीपदाची काळजी करु का? तुम्ही सर्व्हेवाले तरी कशासाठी हे थोटे उद्योग करता? हे असलं काहीतरी विचारत बसण्यापेक्षा हाताला काम मिळव लेका!! माझ्या मनात हे येवढंच आहे, जा!!

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.