ऑक्टोबरमध्ये घाऊक महागाईही वाढली
Marathi November 16, 2024 05:26 AM

यापूर्वीच्या 1.84 वरून 2.40 टक्क्यांपर्यंत मजल

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

किरकोळ महागाई दराप्रमाणे घाऊक महागाई दरातही ऑक्टोबर महिन्यात वाढ झाली आहे. ऑक्टोबरात हा दर 2.40 टक्के राहिला, जो सप्टेंबरमध्ये 1.84 टक्के होता. बटाटे आणि भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाल्याने घाऊक महागाई दरावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. अन्नपदार्थांच्या दरात वाढ झाल्याने घाऊक महागाई निर्देशांकात वाढ झाल्याची माहिती देण्यात आली. ऑक्टोबर महिन्यात भाज्यांच्या घाऊक दरात सप्टेंबरच्या तुलनेत 63 टक्क्यांची वाढ झाली आहे. ही गेल्या 14 महिन्यांमधील सर्वाधिक वाढ आहे. सप्टेंबर महिन्यात ही वाढ 9.5 टक्के होती. तर ऑक्टोबरमध्ये ती 11.6 टक्के झाली. प्रामुख्याने बटाट्याच्या दरात सर्वात मोठी वाढ दिसून आली आहे. बटाट्याचा दर सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरात घाऊक पातळीवर 78.7 टक्के वाढला आहे. कांद्याच्या भाववाढीत मात्र घसरण झाली असून ती सप्टेंबर महिन्याच्या 78,8 टक्क्यांवरुन ऑक्टोबरात 39.25 टक्के झाली आहे. याचाच अर्थ असा की सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात कांद्याचा घाऊक भाव घसरला आहे.

महिन्याच्या तुलनेत 3 टक्के वाढ

सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत घाऊक महागाई दरात ऑक्टोबरमध्ये 3 टक्के वाढ झाली आहे. विशेषत: अन्नपदार्थांच्या दरात झालेली मोठी वाढ हेच घाऊक महागाई दरवाढीचे सर्वात महत्वाचे कारण असल्याची माहिती केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य विभागाने दिली आहे. अन्नपदार्थ उत्पादने, इतर मॅन्युफॅक्चरिंग उत्पादने, यंत्रे आणि साधने यांचे उत्पादन तसेच मोटारी आणि स्वयंचलित वाहनांचे उत्पादन, ट्रेलर्स आणि सेमीट्रेलर्स यांचे उत्पादन महाग झाल्याचाही परिणाम घाऊक महागाई दरावर झाला आहे. सप्टेंबरात मॅन्युफॅक्चर्ड उत्पादनांचा घाऊक महागाई दर 1 टक्का होता. ऑक्टोबरात तो वाढून 1.5 टक्के झाला आहे. तर जीवनावश्यक वस्तूंचा घाऊक महागाई दर गेल्या ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये 8.1 टक्के इतका झाला आहे, अशीही माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.