Jayant Patil : स्टेजवर आले... ना सत्कार स्वीकारला, ना हार घेतला थेट...; जयंत पाटलांच्या 'त्या' कृतीची जोरदार चर्चा
एबीपी माझा वेबटीम November 16, 2024 01:43 PM

पुणे : वडगावशेरी मतदार संघातील वातावरण पोर्शे प्रकरणामुळे चांगलंच तापल्याचं (Pune Wadgaon Sheri) दिसत आहे. महाविकास आघाडीच्या प्रत्येक नेत्याकडून पोर्शे प्रकरणावर बोललं जातंय आणि त्यामार्फत महायुतीच्या उमेदवारावर निशाणा साधताना दिसत आहे. मात्र जयंत पाटलांनी आरोप प्रत्योरोपासोबतच भर सभेत पोर्शे प्रकरणात मृत्यू झालेल्या दोन तरुणांना श्रद्धांजली वहिली. त्यांच्या या कृत्याची आता सगळीकडे चर्चा होत आहे.  "माझं काय म्हणणं आहे, सत्कार वगैरे नको, त्या पोर्शे कार अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोघांना श्रद्धांजली वाहूयात, सत्कार बंद करा" असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्कार नाकारला. जयंत पाटील यांची शुक्रवारी बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारार्थ धानोरी परिसरात जाहीर सभा होती. जाहीर सभेतच हा संपूर्ण प्रकार घडला. पोर्शे अपघात प्रकरणातील बळींना श्रध्दांजली वाहण्यासाठी जयंत पाटील यांनी स्वतःचा सत्कार बाजूला ठेवला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत जयंत पाटील बोलत होते. या सभेत जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा पोर्शें अपघात प्रकरणावरून आमदार सुनील टिंगरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. एखादा आमदार गरिबासाठी राबला तर त्याचे कौतुक होते. मात्र इथले आमदार श्रीमंतांच्या मुलाचे सुचली पुरवण्यासाठी रात्रभर नोकरासारखे दाबले असे म्हणत त्यांनी पोर्शें प्रकरणावरून आमदार टिंगरे यांच्यावर निशाणा साधला. 

आपल्या घणाघाती भाषणात जयंत पाटील म्हणाले, "विकास करणारा आमदार हवा कि विनाश करणारा आमदार हवा , हे तुम्ही राज्याला दाखवून दिले पाहिजे. बापूसाहेब पठारे हे एक कर्तबगार उमेदवार आहेत. त्यांनी वडगावशेरीतील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत. त्यांच्या रुपाने वडगावशेरीत विकासाचे नवे पर्व सुरू होईल. असा दमदार उमेदवार विधानसभेत गेला पाहिजे."

श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी आमदार नोकरासारखे राबले; जयंत पाटलांची सुनील टिंगरेंवर जहरी टीका

एखाद्या आमदाराने गरिबासाठी रात्र काढली तर त्याचे कौतुक होते. मात्र हे आमदार श्रीमंताच्या मुलाचे चोचले पुरवण्यासाठी एखाद्या नोकरासारखी रात्रपाळी करत बसले. अशा आमदाराला आता घरी बसवा अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वडगावशेरीचे विद्यमान आमदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारासाठी जयंत पाटील यांची आज धानोरीत जाहीर सभा पार पडली. या सभेत जयंत पाटील यांनी सुनील टिंगरे यांचा चांगलाच  समाचार घेतला.

 
 
 
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.