कोल्हापूर : हसन मुश्रीफांनी (Hasan Mushrif) शरद पवारांशी (Sharad Pawar) गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Group) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला. कागल विधानसभा मतदारसंघात (Kagal Assembly Constituency) महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार समरजीत घाटगे (Samarjit Ghatge) यांच्या प्रचाराच्या सांगता सभेतून ते बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले की, वयाच्या 84 वर्षी एक जण योद्धा होतो आणि शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार टिकवण्यासाठी राज्य पिंजून काढतो, हे देशातील एकमेव उदाहरण असेल. लोकसभेवेळी तुम्हाला उमेदवारही मिळणार नाही, असं म्हणून आम्हाला हिनवायचे. आम्ही तब्बल दहा जागा लढवल्या, त्यातल्या आठ ठिकाणी आम्ही जिंकून आलो. आता विधानसभेला 86 जागा लढवतो आहोत. त्यातल्या जास्तीत जास्त जागा आम्ही जिंकणार आहोत. त्यातील एक जागा कागलची असणार हे आता निश्चित झालंय, असे त्यांनी म्हटले आहे.
कागलकरांनी आता परिवर्तन करायचं ठरवले असंच दिसतंय. ज्या नेत्याला मोठं केलं, ज्याला राज्य पातळीवर नेलं, प्रसंगी सदाशिव मंडलिक यांचा राग सहन करून मोठं केलं, त्यांनीच गद्दारी केली. गद्दारांना शिक्षा देण्याची परंपरा या राज्याची आहे. हसन मुश्रीफ यांनी शरद पवार यांच्याशी गद्दारी केली आहे. त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. हसन मुश्रीफ यांना गद्दारी करण्याचं काय कारण होतं? झाला असता थोडा त्रास, त्यांनी सहन करायचा होतं. मात्र ज्यांनी इतका त्रास दिला त्यांच्याच मांडीला मांडी लावून ते बसले आणि भाजपने तर ज्या-ज्या नेत्यांवर आरोप केले, त्या-त्या नेत्यांना त्यांनी आपल्यासोबत घेऊन मंत्री केलं, असा हल्लाबोल जयंत पाटलांनी यावेळी केला.
नॅचरल करप्ट पार्टी म्हणून नरेंद्र मोदी आमच्या पक्षाचा उल्लेख करायचे. मात्र जेव्हापासून आमचे काही लोक त्यांच्याकडे गेले तेव्हापासून मोदीजी भ्रष्टाचारावर बोलत नाहीत. ज्यांनी भ्रष्टाचार केले त्यांनाच काखेत घेऊन बसले आहेत. गेल्या दहा वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी यांच्या ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच घेऊन आज देवेंद्र फडणवीस सरकार चालवत आहेत, असे म्हणत जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
राज्यातील अनेक उद्योग गुजरातला गेले, मात्र असं होऊन देखील देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार तोंड वर करून विचारत सुद्धा नाहीत असं का केलं? या बहाद्दरांनी महाराष्ट्रात येणारी गुंतवणूक राज्याच्या बाहेर नेली. देशात गुंतवणुकीसाठी अग्रेसर असलेलं आपलं राज्य आता अकराव्या नंबरवर गेलं आहे. ही देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांची कर्तबगारी आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार नाईलाजाने भाजपची साथ देत आहेत. महाराष्ट्रातील राजकीय सामाजिक वातावरण दूषित करण्याचे काम या सत्ताधाऱ्यांनी केले आहे. बटेंगे तो कटेंगे हे असं योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात येऊन सांगतात. तुमच्या राज्यातील निम्मी माणसं नोकरीसाठी मुंबई येऊन राहिलेत आणि हा गडी आम्हाला सांगतोय बटेंगे तो कटेंगे. अठराव्या शतकातील बटेंगे तो कटेंगे हा विचार एकविसाव्या शतकात लागू पडेल असं आम्हाला वाटत नाही, असे म्हणत जयंत पाटील यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला.
आणखी वाचा