Saroj Patil , कोल्हापूर : "सगळा जाती द्वेष पसरवला जात आहे. तुमची मुलं त्या संभाजी भिडेच्या नादाला लागली आहेत का बघा? त्या गटार गंगेत आपल्या मुलांना जाऊ देऊ नका", असं आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत नेते एनडी पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील यांनी केले आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार समरजीत घाटगे यांच्या प्रचारसभेत बोलत होत्या.
सरोज पाटील म्हणाल्या, ही गर्दी पाहून मला वाटतं मुश्रीफ नक्की गाडला जाणार आहे. शरद पवार यांनी काय दिल नाही सांगा.खा खा खायचं आणि चौकशी लागली पक्ष फोडून पळून जायचं. आमचे जयंतराव पळून गेले का बघा? गद्दार लोकांना मतं दिली तर लोकशाही मेली असं समजा आणि दुसरा ट्रम्प आला म्हणून समजा. तुमची मुलं त्या भिडयाच्या नादाला लागली आहेत का बघा. त्या गटार गंगेत आपल्या मुलांना जाऊ देऊ नका. शरद पवार यांना लहानपणापासून पाहिलं आहे. शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात ते अग्रभागी असायचा.
आमचंच रक्त ज्यांच्यात आहे, तो आमच्याच घरातील गडी ईडीच्या कारवाईला घाबरून तिकडं गेलाय. शरदने अजितला लहानाचा मोठा केला तो अजित या वयात शरदला सोडून पळून गेला. म्हाताऱ्या आई वडिलांना सोडून गेल्यासारखं दुःख झालं. माझ्या भावाच्या अंगात धाडस आहे, या वयात पक्ष आणि चिन्ह काढून घेतलं. पण शरद मोठा वटवृक्ष आहे. ईडीची भिती कोणाला घालता, असा इशाराही सरोज पाटील यांनी दिला.
जयंत पाटील म्हणाले, वयाच्या 84 वर्षी एक जण योद्धा होतो आणि शाहू फुले यांचा विचार टिकवण्यासाठी राज्य पिंजून काढतो. हे देशातील एकमेव उदाहरण असेल. लोकसभेवेळी तुम्हाला उमेदवारही मिळणार नाही असं म्हणून आम्हाला हिनवायचे. दहा जागा लढवल्या त्यातल्या आठ ठिकाणी जिंकून आलो. आता विधानसभेला 86 जागा लढवतो त्यातल्या जास्तीत जास्त जागा आम्ही जिंकणार आहोत. त्यातील एक जागा कागलची असणार हे आता निश्चित झालं. कागलकरांनी आता परिवर्तन करायचं ठरवले असंच दिसते. ज्या नेत्याला मोठं केलं ज्याला राज्य पातळीवर नेलं, प्रसंगी सदाशिव मंडलिक यांचा राग सहन करून मोठं केलं, त्यांनीच गदरी केली.
गद्दारांना शिक्षा देण्याची परंपरा या राज्याची आहे. हसन मुश्रीफ यांनी शरद पवार यांच्याशी गद्दारी केली आहे. त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. हसन मुश्रीफ यांना गद्दारी करण्याचं काय कारण होतं. झाला असता थोडा त्रास सहन करायचा होता. मात्र ज्यांनी इतका त्रास दिला त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले. भाजपने तर ज्या ज्या नेत्यांवर आरोप केले त्या त्या नेत्यांना त्यांनी आपल्या सोबत घेऊन मंत्री केलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या