Nana Patole : काँग्रेसच्या 80 ते 85 जागा,तर महाविकास आघाडीच्या...., नाना पटोलेंनी थेट निकालाचं गणित मांडलं
प्रशांत देसाई November 18, 2024 09:43 PM

Nana Patole :  राज्यभरात आज विधानसभा (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) निवडणुकीच्या तोफा थंडावला आहे. दरम्यान राज्यभरात अनेक ठिकाणी दिग्गज नेत्यांच्या  प्रचार, रॅली आणि सांगता सभा मोठ्या प्रमाणावर होताना दिसून आल्या. तर येत्या 20 तारखेला मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून मतदारांचा अंतिम कौल मतपेटीत कैद होणार आहे. अशातच  महाराष्ट्रात काँग्रेसच्या 80 ते 85 जागा येतील आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या पावणे दोनशेच्यावर जागा येतील असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. आमच्या जागा वाढतील, मात्र कमी होणार नाही. भ्रष्टाचारी, महाराष्ट्र द्रोही महाराष्ट्रातील सरकारला सत्तेतून बाहेर काढण्याचा निर्णय जनतेने घेतलेला होता, तो निर्णय आता महाराष्ट्रातील जनता मतदानाच्या रूपात करणार असल्याचा दावा ही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.

येत्या 20 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवट झाला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या साकोली विधानसभेत प्रचाराचा शेवट केला. यावेळी साकोली, लाखनी आणि लाखांदूर या तिन्ही तालुक्यांमध्ये त्यांनी बाईक रॅली काढत प्रचाराचा शेवट केलाय. नाना पटोले  यांच्या बाईक रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येत महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि तरुणाई सहभागी झाली होती. त्यावेळी बोलताना महाविकास आघाडीच्या पावणे दोनशेच्यावर जागा येतील असा दावा त्यांनी केला आहे.

मुख्यमंत्रीपदाचा निर्णय शेवटी हायकमांड घेतील

जनतेचं प्रेम मला मोठ्या प्रमाणात मिळतं आहे आणि जनतेच्या अपेक्षा माझ्याकडून असनं स्वाभाविक आहे. एवढं वर्ष लोकांनी माझ्यावर प्रेम केलं. त्यामुळं जनतेच्या माझ्याकडून अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. त्यामुळे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे तेवढी माझी जबाबदारी देखील आहे. पण, जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार येईल, तेव्हा आम्ही ठरवलेला आहे. हायकमांड ज्या पद्धतीने निर्णय घेईल, तो आम्हाला सर्वांना मान्य राहील. महाराष्ट्र वाचविणे हे आमचं ध्येय होतं. ते काम मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून केलेलं आहे. त्यामुळे मला अपेक्षा आहे की, महाराष्ट्रातील जनता ही महाविकास आघाडीच्या सरकारला बहुमताने निवडून देईल, असं नाना पटोले यांनी मुख्यमंत्रीपदाच्या बाबतीत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले. 

ठाकरेंबाबत कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही- नाना पटोले

राज ठाकरेंबाबत कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही, असं आम्ही काँग्रेसच्या नेत्यांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या वक्तव्यावर मी कुठली प्रतिक्रिया देणार नसल्याचं स्पष्ट केलंय.  राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या टीकेनंतर राहूल गांधी ऐडपट असल्याचे म्हटलं होतं. त्यावर नाना पटोले यांना विचारणा केली असता त्यांनी यावर बोलण्यास टाळलंय.

इतर महत्वाच्या बातम्या 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.