पाकिस्तानचा संघ 10 डिसेंबरपासून दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर असून तीन सामन्यांची टी20 मालिका, तीन सामन्याची वनडे मालिका आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. टी20 मालिका पार पडली असून पाकिस्तानने 2-0 ने जिंकली. तर वनडे मालिकाही पाकिस्तानच्या खिशात गेली असून 2-0 ने मात दिली आहे. तिसरा सामना औपचारिक असणार आहे. असं असताना दक्षिण अफ्रिका क्रिकेट बोर्डाने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना दिलासा मिळाला आहे. पाकिस्तान आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात तिसरा टी20 सामना जोहान्सबर्ग येथे खेळला जाणार होता. पण पावसामुळे एकही चेंडू टाकला गेला नाही. त्यामुळे क्रीडाप्रेमींचा भ्रमनिरास झाला होता. तसेच तिकिटासाठी भरलेले पैसे वाया गेल्याची भावना होती. स्टेडियममधून बाहेर पडताना क्रीडाप्रेमींच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. पण दक्षिण अफ्रिका क्रिकेटच बोर्डाने एक निवेदन जारी करत क्रीडारसिकांना दिलासा दिला आहे. सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांना तिकीटाचे पूर्ण पैसे मिळणार आहेत.
दक्षिण अफ्रिका बोर्डाने सोशल मीडियावर स्पष्ट केलं की, ‘तुम्हाला सर्वांना माहिती आहे की, 14 डिसेंबर 2024 रोजी वांडरर्स स्टेडियमवर होणारा टी20 सामना पावसामुळे होऊ शकला नाही. त्यामुळे दक्षिण अफ्रिका क्रिकेट बोर्डाने निर्णय घेतला आहे की, 17 डिसेंबरपासून सामना पाहण्यासाठी आलेल्या लोकांचे पैसे परत केले जातील. वांडरर्स स्टेडियममध्ये होणाऱ्या सामन्याची सर्व तिकीट विकली गेली होती. त्यामुळे हा सामना संस्मरणीय ठरू शकला असता. पण पावसामुळे हा सामना होऊ शकला नाही.’
टी20 मालिकेनंतर पाकिस्तानने दक्षिण अफ्रिकेला वनडे मालिकेतही धोबीपछाड दिला आहे. वनडे मालिकेत सलग दोन सामने जिंकत मालिका खिशात घातली आहे. तर तिसरा वनडे सामना 22 डिसेंबरला जोहन्सबर्गमध्ये होणार असून औपचारिक असणार आहे. यानंतर खऱ्या अर्थाने दक्षिण अफ्रिकेची कसोटी लागणार आहे. कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठण्यासाठी अफ्रिकेला एक कसोटी सामना जिंकावा लागणार आहे. जर तसं झालं नाही तर भारताला संधी मिळू शकते.