ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात सध्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. ही 5 सामन्यांची मालिका रंगतदार स्थितीत आहे. मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. तर चौथा सामना हा 26 डिसेंबरपासून होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये करण्यात आलं आहे. बीसीसीआय निवड समितीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी एकदाच संघ जाहीर केला. मात्र ऑस्ट्रेलियाने पहिल्या तिन्ही सामन्यांसाठी स्वतंत्ररित्या संघ जाहीर केला. त्यानंतर आता शुक्रवारी 20 डिसेंबर रोजी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला. ऑस्ट्रेलियाच्या या घोषणेनंतर कसोटी मालिकेसाठीही देवेंद्र फडणवीस सरकारचा फॉर्म्युला वापरलाय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नक्की असं काय झालंय? जाणून घेऊयात.
आयसीसीने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन चौथ्या आणि पाचव्या कसोटीसाठी संघ जाहीर केला. प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, एकूण 15 खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आली आहेत. त्यानुसार पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे या दोन्ही सामन्यांसाठी 2 खेळाडूंना उपकर्णधार करण्यात आलं आहे. अनुभवी फलंदाज आणि स्टीव्हन स्मिथ आणि ट्रेव्हिस हेड या दोघांना उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना महायुतीच्या फॉर्म्युल्याची आठवण झाली नसती तरच नवल. महायुतीतही देवेंद्र फडणवीस हे कॅप्टन (मुख्यमंत्री) तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघे उपमुख्यमंत्री (उपकर्णधार) आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियानेही महायुतीचा फॉर्म्युला वापरलाय, असं गंमतीत म्हटलं जात आहे.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या तिन्ही सामन्यांसाठी स्वतंत्ररित्या संघ जाहीर केले. मात्र तिन्ही संघांमध्ये कोणत्याच खेळाडूकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली नव्हती. मात्र शेवटच्या 2 सामन्यांसाठीच असं का केलं? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थितीत केला जात आहे.
चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ॲबॉट, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, ट्रेव्हिस हेड (उपकर्णधार), जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टास, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, झाय रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क आणि ब्यू वेबस्टर.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.