एका बाजूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दररोज अनेक सामने होत आहेत. तर इथे देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांचा थरारही पाहायला मिळत आहे. मुंबईने 15 डिसेंबर रोजी श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात मध्य प्रदेशचा धुव्वा उडवत सय्यद मुश्ताक अली ट्ऱॉफीचं जेतेपद मिळवलं. त्यानंतर आता विजय हजारे ट्रॉफीचा थरार रंगणार आहे. विजय हजारे ट्रॉफीला 21 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.या स्पर्धेत एकूण 135 सामने होणार आहेत. तसेच एकाच ट्रॉफीसाठी 38 संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेतील यंदाच्या हंगामाबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.
यंदा या हंगामात फायनलसह एकूण 135 सामने होणार आहेत.देशातील विविध 20 शहरांमध्ये सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. स्पर्धेतील अंतिम सामना हा 18 जानेवारी रोजी होणार आहे. तसेच बडोद्यात 9 जानेवारीपासून बाद फेरीतील सामने होणार आहेत. एकूण 38 संघांना 5 गटात विभागण्यात आलं आहे. 3 गटांमध्ये 8-8 संघ आहेत. तर 2 गटांमध्ये 7-7 संघ आहेत. 7 साखळी फेऱ्यांनंतर एकूण 10 अव्वल संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील.
ही स्पर्धा रॉबिन राउंड फॉर्मेटनुसार खेळवण्यात येणार आहे. त्यानुसार ग्रुपमधील प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध प्रत्येकी 1-1 सामना खेळेल. साखळी फेरीनंतर 2 प्लेऑफ, 4 उपांत्य पूर्व, 2 उपांत्य आणि त्यानंतर अंतिम सामना खेळवण्यात येईल.
21 डिसेंबरपासून विजय हजारे ट्रॉफीचा थरार रंगणार
दरम्यान स्पर्धेतील पहिल्याच दिवशी अर्थात 21 डिसेंबरला एकूण 18 सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यानुसार, ए, बी आणि सी गटाचे 4-4 सामने होतील. तर डी आणि ई गटाचे 3-3 सामने होतील. सामन्यांना सकाळी 9 वाजेपासून सुरुवात होईल. सामने टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येतील. तर मोबाईलवर लाईव्ह मॅच पाहायला मिळेल.