Sharad Pawar : संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची शरद पवारांनी घेतली भेट, मोठा निर्णय केला जाहीर
Saam TV December 21, 2024 07:45 PM

sharad pawar visit massajog village over sarpanch santosh deshmukh Death case : बीडच्या माजी सरपंच संतोष देशमुख प्रकरणी शरद पवार यांनी मस्साजोग येथे जाऊन देशमुख कुटुंबाची भेट घेतली. 'या घटनेची सखोल चौकशी व्हावी. तसंच कुटुंबाची आणि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतोय' असं शरद पवार यांनी जाहीर केलं. तसंच कुटुंबांना धीर देऊ, त्यांना आधार देऊ असंही पवार म्हणाले.

बीडमधील संतोष देशमुख प्रकरण राज्यभरात चांगलंच तापलं. विविध नेत्यांनी संताप व्यक्त केला. अशातच राज्य आणि केंद्र सरकार या प्रकरणात जोपर्यंत खोलवर जाणार नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही, असं म्हणाले. तसंच ही सिस्टम दुरूस्त कशी होईल याची काळजी आपण घेतली पाहिजे, असंही शरद पवार म्हणाले.

राज्य आणि केंद्राने याची नोंद घ्यावी

'बजरंग सोनावणे आणि इतर खासदारांनी महाराष्ट्रातील हा प्रश्न उचलून धरला. सूत्रधार पकडला पाहिजे असं सोनवणे यांनी मागणी केली. आरोपीचे संवाद कुणाबरोबर झाले, त्याची माहिती काढली पाहिजे, सखोल चौकशी झाली पाहिजे. विधानसभेत बीडचे आमदार क्षीरसागर आणि जितेंद्र आव्हाड यांनीही हा प्रश्न मांडला. कोणत्या समाजाचे आणि कोणत्या जातीचे आहेत हा विचार केला नाही. अन्याय झाला, त्यावर चौकशी झाली पाहिजे' असं शरद पवार म्हणाले.

..तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही

'सरकारने रक्कम दिली, याची कुटुंबियांनी मदत होईल. पण गेलेला माणूस पुन्हा येत नाही. मदत दिली तरी कुटुंबाचं दु:ख कमी होणार नाही. आम्ही केलेल्या मदतीवर टीका करत नाही. पण प्रकरणाच्या सखोल चौकशी झाली पाहिजे. तातडीनं आरोपीला धडा शिकवला पाहिजे. इथल्या वकिलांनी लेखी निवेदन दिलं, याचा आनंद आहे. मात्र केंद्र सरकार आणि लोक प्रतिनिधी वकील मंडळी तुमचे हितचिंतक म्हणून या प्रश्नाकडे पाहत आहेत.

'या गावातील दहशतीच्या वातावरणाला एकत्र तोंड देऊ. देशमुख कुटुंबाच्या दु:खात आपण सर्व सामील होऊ. राज्य आणि केंद्र सरकार जोपर्यंत या प्रकरणी सखोल चौकशी करीत नाही, आरोपीला शिक्षा देत नाहीत, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.' असा इशाराही शरद पवारांनी दिला.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.