पिंपरी, ता. २१ ः सध्या सर्वत्र कडाक्याची थंडी असून, गुलाबी थंडीमुळे सकाळचे वातावरण मनमोहक बनत आहे. दरम्यान, आज शनिवारी पहाटेच्या वेळी शहरात अनेक ठिकाणी दाट धुक्यानी महामार्गावरील व अंतर्गत रस्त्यावरील वाटा हरवून गेल्या. गडद धुक्यामुळे सर्व वातावरण धूसर बनले होते. ‘वाट एक जुनी, हरवली दाट धुक्यात लपलेले दवबिंदू कुठे चमकतात पानात’, या कवितेसारखे आल्हाददायक चित्र शनिवारी (ता.२१) सर्वत्र पाहायला मिळाले. या धुक्यामुळे सकाळी नऊपर्यंत सूर्यदर्शन देखील झाले नव्हते. सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी गडद धुक्याची अनुभूती घेतली.
‘मॉर्निंग वॉक’ला दाट धुक्याची अनुभूती
‘सकाळ’च्यावेळी मॉर्निंग वॉकला जात असलेल्या नागरिकांना शनिवारी पडलेल्या दाट धुक्यामुळे निसर्गातील सौंदर्य पाहायला मिळाले. अचानक पडलेल्या या धुक्याने मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्यांना सुखद अनुभव घेता आला. दाट धुके पडल्याने त्याचा आनंद घेतला. गेल्या आठ दिवसांपासून वातावरणात बदल होऊन रात्री कडाक्याची थंडी पडत असून सकाळच्यावेळी धुक्याची झालर पाहायला मिळत आहे. यावेळी वाटा धुक्यात हरवून गेल्या होत्या. सकाळी शाळेला जाणारी मुले बोचऱ्या थंडीने कुडकुडत होती. पुणे-मुंबई महामार्गावरदेखील प्रचंड धुके पसरले होते. पहाटे साडेपाचपासून जाणवणाऱ्या धुक्यात वाढ होत असल्याचेही अनेकांनी सांगितले.
पहाटे धुक्याची चादर
निगडी-प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदान, हेगडेवार भवन, रावेत, किवळे, काळेवाडी, थेरगाव, वाकड, पुनावळे, पिंपळे निलख, पिंपरीगाव, चिंचवड, नाशिकफाटा या परिसरात शनिवारी पहाटे धुक्याची चादर पसरली होती. पहाटे पाचपासून धुके दाटले ते सकाळी साडे नऊपर्यंत कायम होते. दाट धुक्यामुळे पुढील व्यक्ती दिसणेही अवघड झाले. त्यामुळे १५ ते २० फुटावरील दृश्य पाहण्यास देखील अडचण निर्माण झालेली होती. त्यामुळे सकाळी आठपर्यंत वाहनांना प्रखर दिवे लावण्याची वेळ आली होती. वाहनधारकांना धुक्यामुळे वाहनाचे दिवे सुरू ठेवूनच वाहने चालवावी लागली. नऊ वाजले तरी अनेक ठिकाणी धुके दिसत होती. सकाळी पडलेल्या धुक्याचे क्षण अनेकांनी आपल्या घराच्या खिडकी, गॅलरी, गच्चीवरून मोबाइलमध्ये टिपले.