AUS vs IND : अश्विन निवृत्तीचा निर्णय बदलणार? त्या ट्विटमुळे चर्चांना उधाण
GH News December 21, 2024 08:09 PM

टीम इंडियाचा ऑलराउंडर आर अश्विन याने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर निवृत्तीचा बॉम्ब टाकला आणि क्रिकेट चाहत्यांना झटका दिला. टीम इंडिया आता बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील चौथा सामना हा मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये खेळवण्यात येणार आहे. मात्र त्याआधी आर अश्विनच्या एका ट्विटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. अश्विनने निवृत्तीनंतर अवघ्या काही तासांनी विराटच्या ट्विटला रिप्लाय दिला. अश्विनच्या या रिप्लायमुळे तो आता निवृत्तीचा निर्णय मागे घेतोय का? असा अर्थ काढला जात आहे. अश्विनने नक्की काय म्हटलंय? जाणून घेऊयात.

अश्विनने विराटच्या ट्विटला क्रिप्टीक रिप्लाय दिलाय. त्यामुळे क्रिकेट चाहते भूतकाळातील संदर्भ जोडून त्याचे वेगवेगळे अर्थ काढत आहेत. विराटने अश्विनसाठी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन खास पोस्ट केली. विराटने फोटो पोस्ट करत अश्विनसोबतच्या आठवणी शेअर केल्या. अश्विनने विराटचं या पोस्टसाठी आभार मानले. तसेच अश्विनने या पोस्टमध्ये विराटला एमसीजीमध्ये (मेलबर्न क्रिकेट ग्राउंड) सोबत खेळण्याचं आश्वासन दिलंय. त्यामुळे क्रिकेट चाहते संभ्रमात आहेत. अश्विनने विराटच्या ट्विटल रिप्लाय देताना काय म्हटलंय? जाणून घेऊयात.

विराटचं ट्विट काय?

अश्विनने बुधवारी 18 डिसेंबरला निवृत्ती जाहीर केली. विराटने अश्विनच्या निवृत्तीवर एक पोस्ट केली. “मी तुझ्यासोबत 14 वर्ष खेळलो आहे. जेव्हा तु मला निवृत्ती घेतोय असं सांगितलंस तेव्हा मी भावूक झालो. मला यासह आपण एकमेकांसह इतकी वर्ष खेळल्याचं सर्व काही आठवलं. मी तुझ्यासोबत या प्रवासातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला”, असं विराटने ट्विट केलं.

विराटच्या पोस्टला अश्विनचा रिप्लाय

“धन्यवाद मित्रा. मी जसं म्हटलं की तुझ्यासोबत एमसीजीमध्ये बॅटिंग करण्यासाठी येईन”, असा रिप्लाय अश्विनने विराटच्या पोस्टवर केला. मात्र अश्विनला यातून नक्की काय सुचवायचंय हे अनेक क्रिकेट चाहत्यांना समजलं नाही.

अश्विनचा रिप्लाय

अश्विनच्या रिप्लायचा अर्थ काय?

अश्विनचा रिप्लाय क्रिकेट चाहत्यांना कळाला नाही. मात्र अश्विनने मेलबर्नचा उल्लेख करत 2 वर्षांआधीच्या विराटसोबतच्या खेळीला उजाळा दिल्याचं म्हटलं जात आहे. आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2022 स्पर्धेत मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना खेळवण्यात आला. या सामन्यात अश्विनने शेवटच्या चेंडूवर 1 धाव करत टीम इंडियाला विजयी केलं होतं. तेव्हा अश्विनसोबत नॉन स्ट्राईक एंडवर विराट कोहली होता. अश्विनने ट्विटमधून या भागीदारीचा उल्लेख केल्याचा अंदाज क्रिकेट चाहत्यांकडून वर्तवण्यात येत आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.