खारघर, ता. २१ (बातमीदार) : पापडीचा पाडा गावाजवळील गणेश विसर्जन घाटालगत गोहत्या करून त्याचे अवशेष तलाव परिसरात फेकून पसार झालेल्या व्यक्तींच्या विरोधात खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांनी गणेश घाटावर आंदोलन करून परिसरात सुरू असलेला अनधिकृत कत्तलखाना तातडीने बंद न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
खारघर सेक्टर ३९ येथील पापडीचा पाडा गावालगत गणेश घाट आहे. गुरुवारी (ता. १९) रात्री अज्ञात व्यक्तीने गणेश घाटालगत गोवंश जनावरांची कत्तल करून अवशेष एका गोणीत भरून तलावाची पायरी आणि बाजूच्या नाल्यात फेकले आहेत. या प्रकाराची माहिती पापडीचा पाडा ग्रामस्थांना मिळताच पोलिस ठाणे गाठून ग्रामस्थ तसेच सोमेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अभिमन्यू गायकर यांनी खारघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पनवेल येथील पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. मुकेश मचडे आणि पनवेल पंचायत समितीचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आनंद मारकवार यांच्याकडून अवशेषांच्या नमुन्यांची तपासणी केली जाणार आहे. खारघर पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला आहे.