नागपूर : राज्याचा सार्वजनिक आरोग्य तसेच वैद्यकीय शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असल्याची माहिती ‘कॅग’च्या लेखापरीक्षण अहवालातून पुढे आली आहे. या दोन्ही विभागात डॉक्टरची संख्या २७ , परीचारकांची संख्या ३५ तर निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या ३१ टक्क्यांनी कमी असल्याचे आढळून आले आहे. कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेही प्रादेशिक असमतोल असल्याचे आढळले आहे.
भारताचे नियंत्रक व महलेखापरिक्षक (कॅग) यांचा महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवांचे व्यवस्थापन यावरचा लेखापरीक्षण अहवाल शनिवारी विधानसभेत सादर झाला. हा अहवाल २०१६ -१७ ते २०२१ - २२ या कालावधीतील आहे. मनुष्यबळ कमी असल्याने वैद्यकीय यंत्रणेवर मोठा ताण असल्याचेही अहवालातून दिसून आले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत डॉक्टरांच्या २२ टक्के, परिचारिकांच्या ३५ टक्के आणि निमवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या २९ टक्के जागा रिक्त राहिली आहेत. स्त्री रुग्णालयात हीच उपलब्धता अनुक्रमे २३, १९ व १६ टक्के अशी आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागांतर्गत डॉक्टर, परिचारिका व निम वैद्यकीय कर्मचारी यांची कमतरता अनुक्रमे ३७, ३५ व ४४ टक्के इतकी आहे. ‘कॅग''ने मुंबई, पुण्यासह राज्यातील नऊ महापालिकेतील मनुष्यबळाची माहिती घेतली.
त्यानुसार मंजूर १४ हजार ८४ जागांपैकी चार हजार ८०६ म्हणजे तब्बल ३४ टक्के जागा रिक्त असल्याचे आढळून आले. राज्यातील १६ आयुष महाविद्यालयात डॉक्टर, परिचारिका, निम वैद्यकीय कर्मचारी अशा मंजूर जागांची संख्या एक हजार ७९६ एवढी असली तरी यापैकी ४२ टक्के म्हणजे ७४९ जागा रिक्त राहिल्या आहेत.
डॉक्टरांवर कामाचा ताण
आरोग्य विभागातील रिक्त जागांची संख्या मोठी असल्याने उपलब्ध डॉक्टरांवर कामाचा ताण आहे. विभागाकडील २६ टक्के डॉक्टर हे नियमापेक्षा दुप्पट रुग्णांची तपासणी करत आहेत तर नवीन आरोग्यसेवा संस्थांच्या बांधकामांची ७० टक्के कामे आणि आरोग्य सेवा संस्था अद्ययावत करण्यासाठी घेतलेली ९० टक्के कामे सप्टेंबर २०२२ पर्यंत अपूर्ण राहिली आहेत. याचबरोबर ‘हापकिन’ संस्थेकडून मागणीच्या तुलनेत अत्यंत कमी प्रमाणात औषधे आणि उपकरणांचा पुरवठा झाल्याचे अहवालात नमूद केले आहे.
प्रादेशिक असमतोल
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन हजार ४६१ लोकसंख्येसाठी डॉक्टरांची एक जागा मंजूर
पालघर जिल्ह्यात १८ हजार २३५ लोकसंख्येमागे एक जागा मंजूर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाच हजार ५७८ लोकसंख्येमागे एक डॉक्टर उपलब्ध
जळगाव जिल्ह्यात २५ हजार ५१७ लोकसंख्येमागेही एकच डॉक्टर उपलब्ध