Maharashtra Assembly Election : निवडणूक आयोगाकडून काँग्रेसची 'पोल'खोल; सर्व दावे धडाधड फेटाळले, काय दिले उत्तर?
Sarkarnama December 25, 2024 01:45 AM

New Delhi : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महत्वाची माहिती देण्यात आली आहे. काँग्रेसने तक्रारींमध्ये केलेले सर्व दावे आयोगाने फेटाळून लावत याबाबतची कारणेही दिली आहेत. मतदारांनी नावे गायब होणे, मतदानादिवशी शेवटच्या तासाभरात वाढलेले मतदान, ईव्हीएम आदी मुद्द्यांवर काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आले होते.

ने केलेल्या सर्व दाव्यांवर आयोगाने मंगळवारी काँग्रेसला सविस्तर उत्तर पाठवले आहे. महाराष्ट्रातील 50 विधानसभा मतदारसंघात जुलै ते नोव्हेंबर या कालावदीत 50 हजार मतदार वाढल्याची तक्रार काँग्रेसने केली होती. हा दावा फेटाळण्यात आला आहे. जुलै ते नोव्हेंबर या काळात 50 हजार मतदार वाढले आहेत, पण हे केवळ सहा मतदारसंघांशी संबंधित असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

मतदानाच्या टक्केवारीवरही ने उत्तर दिले आहे. अचानक मतदान वाढल्याचे दाखवले जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. त्यावर आयोगाने केलेल्या खुलाशामध्ये म्हटले आहे की, मतदानाच्या टक्केवारीत बदल करणे, अशक्य आहे. कारण उमेदवारांच्या एजंटजवळ फॉर्म 17 सी असतो. त्यामध्ये मतदान संपल्यानंतर मतदानाची टक्केवारी नमूद केली जाते. ते आकडे पडताळून पाहता येऊ शकतो, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

मतदानाचा ट्रेंड पाहता यावा यासाठी व्हीटीआर अप ही केवळ एक सुविधा आहे. फॉर्म 17 सी हा मतदानाच्या टक्केवारीचा एकमेव अधिकृत स्त्रोत आहे. कोणत्याही मतदान केंद्रावर किती टक्के मतदान झाले, हे त्यामध्ये नमूद असते. मतदान केंद्र बंद करण्यापूर्वी उमेदवारांना ते दिले जाते, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

अनेक मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आल्याचा दावाही काँग्रेसकडून करण्यात आला होता. नाव वगळण्याच्या प्रक्रियेत सर्व गोष्टींचे पालन करण्यात आल्याचे आयोगाने म्हटले आहे. नोटीस पाठवण्याबरोबरच फील्ड सर्व्हे करून निश्चित करण्यात आले होते की, मतदारांचा मृत्यू होणे, पत्ता बदल, संबंधित पत्त्यावर सध्या राहत नसतील तर अशा मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत, असे आयोगाने सांगितले आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.