Australia vs India 4th Test Video: गुरुवारपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्याला सुरुवात झाली आहे. हा बॉक्सिंग डे कसोटी सामना असून मेलबर्नला होत आहे. या सामन्याच्या सुरुवातीलाच गरमागरमीचे वातावरण दिसून आले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ जेव्हाही आमने-सामने असतात, तेव्हा काही ना काही वाद होताना बऱ्याचदा दिसतो. दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये स्लेजिंगही होताना पाहायला मिळते. असाच प्रकार या सामन्यातही दिसून आला.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच या सामन्यातून १९ वर्षीय सॅम कॉन्स्टास याने ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने पहिल्याच डावात सलामीला खेळताना त्याच्या प्रतिभेची चुणूक दाखवली आहे. त्याने उस्मान ख्वाजासह सलामीला खेळताना आक्रमक सुरुवात केली.
कोन्स्टासने या मालिकेतील भारताचा सर्वोत्तम गोलंदाज ठरलेल्या जसप्रीत बुमराहविरुद्धच आक्रमक पवित्रा स्वीकारला. त्याने बुमराहविरुद्ध ७ व्या षटकात १४ धावा १२ व्या षटकात १८ धावा ठोकल्या. यादरम्यान १० व्या षटकाच्या अखेरीस कोन्स्टास आणि भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले.
झाले असे की कोन्स्टासच्या जवळून जाताना विराट त्याला धडकला. विराटचा धक्का कोन्स्टासच्या खांद्याला लागला. हे कोन्स्टासला आवडले नाही आणि तो विराटला काहीतरी बोलला. त्यावर विराटनेही त्याला प्रत्युत्तर केले.
त्यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाल्यानंतर उस्मान ख्वाजा आणि अंपायरने मध्यस्थी केली आणि दोघांना बाजूला केले. तसेच सिराज आणि कोन्स्टास यांच्यातही सुरुवातीला गरमागरमी झाल्याचे दिसले होते.
तथापि, कोन्स्टास याने आक्रमक खेळताना ५२ चेंडूतच अर्धशतक पूर्ण केले होते. पण अखेर त्याचा अडथळा रवींद्र जडेजाने २० व्या षटकात दूर केला. त्याने कोन्स्टासला पायचीत पकडले. कोन्स्टासने ६५ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ६० धावा केल्या. त्याने उस्मान ख्वाजासह ८९ धावांची भागीदारी केली.
कोन्स्टास हा ऑस्ट्रेलियासाठी कसोटीत सर्वात कमी वयात अर्धशतक ठोकणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. त्याने हे अर्धशतक केले, तेव्हा त्याचे वय १९ वर्षे ८५ दिवस होते. या यादीत अव्वल क्रमांकावर इयान क्रेग आहे. त्यांनी १९५३ मध्ये मेलबर्नमध्ये खेळताना १७ वर्षे २४० दिवस वय असताना अर्धशतक केले होते.