हिंगोली : जिल्ह्यात भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने पिण्याच्या पाण्याचे स्रोत, तसेच पाण्याची नोव्हेंबर महिन्यात प्रयोगशाळेत तपासणी केली. यात जिल्ह्यातील १२ गावांतील १८ पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे नमुने दूषित आढळले आहेत. या ठिकाणी आरोग्य विभागाने ग्रामपंचायतींना उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्ह्यात वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वतीने जिल्ह्यातील ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावातील पिण्याच्या पाण्याचे नमुने नोव्हेंबर महिन्यात तपासण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील हिंगोली, कळमनूरी व सेनगाव तालुक्यातील प्राप्त यादीनुसार अणुजैविक तपासणीत दुषीत पाण्याच्या स्त्रोतांनुसार नऊ गावातील पिण्याच्या पाण्याचे नमुने दूषित असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे.
यामध्ये हिंगोली प्रयोग शाळेत तपासण्यात आलेल्या तालुक्यातील गावात उमरा येथील सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळील विहीर, माळसेलू येथील जिल्हा परिषद शाळेजवळ असलेला बोअरवेल, तसेच गावाजवळ असलेली विहीर, कनेरगाव नाका येथील भागवत गावंडे यांच्या घराजवळ असलेला बोअरवेल, तसेच सार्वजनिक पाणीपुरवठा योजना विहीर येथील पाण्याचा समावेश आहे. खानापूर चित्ता येथील जिल्हा परिषद शाळेजवळ असलेल्या बोअरवेलचे पाणी दूषित आहे.
कळमनूरी येथील उपविभागीय प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या अहवालानुसार गौळ बाजार येथील वडार वस्तीत असलेला हातपंप, सुकळीवीर येथील पंडित वागतकर यांच्या घराजवळ असलेला हातपंप यांचे पाणी दुषीत आढळले आहे.
सेनगाव येथील उपविभागीय प्रयोग शाळेत तपासण्यात आलेल्या अहवालानुसार गौडाळा येथील जिल्हा परिषद शाळेजवळ असलेला हातपंप, दादाराव शिंदे यांच्या घराजवळ असलेला हातपंपाचा समावेश आहे.