Maharashtra Politics : पूर्वीच्या पालकमंत्रिपदासाठी 'जुन्यां'चा आग्रह स्वजिल्ह्यासाठीही हेका; मुख्यमंत्र्यांची कोंडी
esakal December 27, 2024 10:45 AM

सदानंद पाटील

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये ज्या पालकमंत्र्यांकडे जे जिल्हे होते, तेच जिल्हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्येही कायम ठेवावेत, असा आग्रह मंत्र्यांनी धरला आहे. यात सत्ताधारी तिन्ही पक्षातील मंत्र्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अनेक जिल्ह्यात पालकमंत्री एका पक्षाचा तर त्याच जिल्ह्यात आमदारांची सर्वाधिक संख्या ही इतर घटक पक्षाची असल्याने पालकमंत्रिपदाचा तिढा निर्माण झाला आहे.

काही मंत्री तर स्वतःच्याच जिल्ह्यात पालकमंत्री होण्यासाठी हटून बसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि घटक पक्षाच्या पक्षप्रमुखांसमोर पेच निर्माण झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा १५ डिसेंबरला विस्तार करण्यात आला. यानंतर पाच दिवसांनी खाते वाटप करण्यात आले. मात्र, खाते वाटप झाले असले तरी बहुतांश मंत्र्यांना अजून हवे तसे कार्यालय मिळालेले नाही.

मंत्रालयात फिरून अनेक मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक दालनाचा शोध घेत आहेत. ज्यांना दालन मिळाले आहे, ते दालनाच्या डागडुजीसाठी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत आहेत. अनेक कॅबिनेट मंत्र्यांना राज्य मंत्र्यांपेक्षा खराब दालन देण्यात आल्याने अनेक मंत्री संताप व्यक्त करत आहेत. मंत्र्यांनाच कार्यालयासाठी पाठपुरावा करावा लागत असल्याने, त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

मंत्र्यांच्या नाराजीत भर

दालन आणि निवासस्थान मनाप्रमाणे मिळत नसतानाच पालकमंत्रिपद हुलकावणी देण्याची शक्यता असल्याने मंत्र्यांच्या नाराजीत भर पडत आहे. वास्तविक ज्या सत्ताधारी पक्षाचे जिल्ह्यातील आमदार अधिक, त्यांच्याकडे पालकमंत्री पद अशी प्रथा आहे. किंवा सर्वाधिक आमदार असताना त्या पक्षाचा जिल्ह्यातील कोणी मंत्री नसेल तर त्याच पक्षाच्या इतर जिल्ह्यातील मंत्र्यांना पालकमंत्रिपदाची जबाबदारी दिली जाते.

अपवाद वगळता सर्वच सरकारमध्ये याच पद्धतीने पालकमंत्रिपदाची निवड करण्याची पद्धत आहे. मात्र यावेळी जुन्या पद्धतीला फाटा दिला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पक्षांतर्गत नाराजीनाट्य

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये पुणे, रायगड, नाशिक, संभाजीनगर, बीड, सातारा, यवतमाळ, कोल्हापूर आदी जिल्ह्यात पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवण्यासाठी आणि आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, पालकमंत्रिपदाचा आग्रह सर्वच पक्षांकडून धरला जात आहे.

मात्र, जुन्या पालकमंत्र्यांना त्यांचा जिल्हा सोडवत नसल्याने, नवीन मंत्र्यांची अडचण झाली आहे. स्वपक्षातील मंत्री सोयीची भूमिका घेत असल्याने, सत्ताधारी तिन्ही पक्षात पालकमंत्री निवडीवरून नाराजीनाट्य सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

डोकेदुखी वाढली

पालकमंत्रिपदासाठी रायगड येथून शिवसेनेचे भरत गोगावले यांनी शड्डू ठोकला आहे. तर महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे या पुन्हा एकदा पालकमंत्री होण्यासाठी आग्रही आहेत. सातारा जिल्ह्यात तर चार कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे प्रत्येकालाच पालकमंत्री होण्याची अपेक्षा आहे. ठाणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्यात पालकमंत्री पदासाठी चुरस आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात हसन मुश्रीफ आणि प्रकाश आबिटकर यांच्यापैकी कोणाच्या गळ्यात पालकमंत्री पदाची माळ पडणार, याबाबत कार्यकर्त्यांना उत्सुकता लागली आहे. जिल्ह्यात सेनेचे चार तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच आमदार आहे. त्यामुळे पालकमंत्री निवड, ही नेत्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत असल्याचे सांगण्यात येत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.