शतकवीर लेकाला भेटताच आई इमोशनल, वडिलांची मिठी अन्... Nitish Kumar Reddy च्या कुटुंबियांच्या भेटीचा Video
esakal December 29, 2024 12:45 AM

Nitish Kumar Reddy Imotional Moment With Family : आंध्र प्रदेशचा २१ वर्षीय खेळाडू नितीश कुमार रेड्डीने आज ऑस्ट्रेलियामध्ये शतक झळकावले. करोडो क्रिकेट चाहते आज नितीशच्या शतकासाठी प्रार्थना करत होते आणि त्याने शेवटी शतक पूर्ण केलेच. मेलबर्न स्टेडियमध्ये हजारो प्रेक्षकांमध्ये आणखी एक व्यक्ती आज नितीशच्या शतकासाठी प्रार्थना करत होता. ते होते नितीशचे वडील. त्याचे शतक पूर्ण झाल्यानंतर नितीशचे वडील व कुटुंब प्रचंड भावूक झाले. त्यांच्या सर्वांच्या इतक्या वर्षांच्या मेहनतीला आज फळ मिळाले.

BCCI ने आपल्या अधिकृत हॅंडलवरून नितीशचा आपल्या कुटुंबासोबतचा भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याचे कुटुंब त्याला भेटण्यासाठी हॉटेलवर आले आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये "हे आनंद अश्रू थांबले नाहीत. रेड्डी कुटुंब आज भावनांनी भारावले आहे. नितीशच्या एमसीजीवरील विलक्षण पहिल्या कसोटीतील शतकाचे साक्षिदार झाले आहेत. हा दिवस आठवणींमध्ये कायमचा कोरला गेला आहे, " असा मजकूर लिहीला आहे.

नितीशच्या या खेळीनंतर त्याच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरनेही त्याच्या खेळीचे कौतुक केले. ट्वीट करत सचिन म्हणाला, " नितीशची ही खेळी लक्षात राहिल. पहिल्या कसोटीपासूनच त्याने मला प्रभावित केले आहे आणि त्याचा संयमीपणा आणि स्वभाव दिसून आला. आज त्याने या मालिकेत कामगिरी उंचावत महत्त्वाची खेळी केली. त्याचप्रमाणे त्याला वॉशिंग्टन सुंदरनेही सक्षमपणे साथ दिली. उत्तम खेळलात."

त्याचप्रमाणे माजी खेळाडू युवराज सिंगनेही नितीशचे कौतुक केले. युवराज म्हणाला, " उत्तम खेळी नितीश कुमार रेड्डी! संपुर्ण भारताला तुझा अभिमान आहे. "

माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाले, "काय खेळलास नितीश. ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी शतक झळकावणारा तिसरा सर्वात तरुण भारतीय बनणे आणि संकटात सापडलेल्या संघाला बाहेर काढणे, मला खात्री आहे की हे अनेकांपैकी पहिले असेल. तुझ्या सकारात्मक आणि निर्भय खेळीचा आनंद घेतला. असाच खेळत राहा. देव तुला सदैव आशीर्वाद देईल."

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.