Akkalkot: लागोपाठ आलेल्या सुट्यांमुळे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी, पहा फोटो
esakal December 29, 2024 07:45 PM

Akkalkot: नाताळ सणाच्या सुट्ट्या व सलग सुट्ट्या यामुळे अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली आहे. शहरातील देवस्थाने व वटवृक्ष मंदिरात भक्तांना श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी भक्तांच्या पाठीपासून लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या.

भक्तांना कोणत्याही प्रकारचे अडचणी येऊ नये यासाठी पोलीस,नगरपालिका, वटवृक्ष देवस्थान समिती, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ व तहसील कार्यालय यांनी विविध उपयोजना केल्याने दिवसभरात सुमारे दीड लाखापेक्षा जास्त भक्तांनी दर्शन घेतले. अन्नछत्र मंडळात दिवसभरात सुमारे ७५ हजारपेक्षा जास्त भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

सध्या नाताळाच्या सुट्ट्या सुरू आहेत. तसेच शनिवार,रविवार व सोमवार रोजी नोकरदारांना सलग सुट्ट्या आल्यामुळे शनिवारी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांनी प्रचंड गर्दी केली. पहाटेपासून भक्तांनी दर्शनासाठी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिराच्या दक्षिण द्वारापासून लांबच लांब रांगा लावल्या होत्या.

तसेच पोलीस खाते,नगरपालिका व तहसील कार्यालयाच्या सहकार्याने मुरलीधर मंदिर परिसरात मोकळे झालेल्या जागेत बॅरिकेट्स उभे करून त्या ठिकाणी भक्तांच्या रांगा लावण्यात आलेल्या होत्या. वटवृक्ष देवस्थान समितीने भक्तांचा उन्हापासून बचाव व्हावा यासाठी दक्षिणद्वार ते मुरलीधर मंदिरपर्यंत मंडप उभे केले होते.

पोलीस खात्याने श्रीमंत कमलाराजे चौक,राजे फत्तेसिंह चौक, कारंजा चौक येथे लाकडी बांबूंचे बॅरिकेट्स बांधून वाहन मंदिर परिसरात जाऊन वाहतूक खोळंबा होणार नाही याची दक्षता घेतली. तसेच बेडर कन्हैया चौकातील पुलावर बॅरिकेट्स लावून मंदिरकडे वाहने जाणार नाहीत व वाहनांची कोंडी होणार नाही याची काळजी घेण्यात आली.

मंगरूळ चौकातून बायपासमार्गे मैंदर्गी रोडने अन्नछत्र मंडळाच्या पार्किंगमध्ये वाहनांचे पार्किंग करण्यात येत होते. तसेच मैंदर्गी रोड,बासलेगाव रोड,बायपास मार्ग,श्रीमंत कमलाराजे चौक,श्री शहाजी हायस्कूल परिसर या भागात वाहने मोठ्या प्रमाणावर पार्किंग करण्यात आलेली होती. पोलीस खात्याने वाहनांचे व पार्किंगचे नियोजन व्यवस्थित केले होते तरी सुद्धा वाहनांची प्रचंड संख्या व भक्तांचे अलोक गर्दी यामुळे पोलिसांची तारेवरची कसरत होत होती.

वटवृक्ष मंदिरात टप्प्याटप्प्याने भक्तांना दर्शनासाठी सोडण्यात येत होते. वटवृक्ष मंदिरात दुपारची आरती पुरोहित मंदारमहाराज यांनी केली.या ठिकाणी स्वामी भक्तांना दर्शन घेणे सुलभ व्हावे यासाठी वटवृक्ष देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे,सचिव आत्माराम घाटगे व इतर विश्वस्तमंडळी प्रयत्नशील होती.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळामध्ये भक्तांनी महाप्रसादासाठी लांबचलांब रांगा लावलेल्या होत्या. शनिवारी दिवसभरात अन्नछत्र मंडळात सुमारे ७५ हजारपेक्षा जास्त स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

अन्नछत्र मंडळात भक्तांना महाप्रसाद घेणे सुलभ व्हावे यासाठी अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले,उपाध्यक्ष अभय खोबरे सचिव शामराव मोरे, भाऊ कापसे आधी प्रयत्नशील होते.

पोलिसांनी मुरलीधर मंदिरसमोर व बेडर कन्हैया चौक येथे स्टेज उभा करून माइकवरून भक्तांना योग्य त्या सूचना देत होते. त्यामुळे भक्तांची सोय होत होती. विभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार,अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे,सहायक पोलीस निरीक्षक निलेश बागाव,पोलीस उपनिरीक्षक सिद्धाराम चव्हाण,वाहतूक पोलीस बाबुराव पाटील,रफिक शेख, गजानन शिंदे,विपिन सुरवसे,माने आदीं भक्तांच्या सोयीसाठी व वाहतूक खोळंबा होऊ नये यासाठी प्रयत्नशील होते.

बुधवार पेठेतील श्री स्वामी समर्थ समाधी मठातसुद्धा स्वामींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी स्वामीभक्तांनी लांबचलांब रांगा लावलेल्या होत्या. या ठिकाणी भक्तांना दर्शन घेणे सुलभ व्हावे यासाठी समस्त पुजारी वर्ग प्रयत्नशील होते.

अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे,पोलीस उपनिरीक्षक सिद्धाराम चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाहतूक कोळंबा होऊ नये व भक्तांना अडचणी येऊ नयेत यासाठी मोठे प्रयत्न केले. तसेच योग्य नियोजन करून बॅरिकेट्स,साउंडवरून सूचना व रांगेचे नियोजन अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केलेले होते. भक्तांचा व त्यांच्या वाहनांचा प्रचंड महापूर अक्कलकोट शहरात आला तरी पोलीस खात्याने योग्य पद्धतीने सर्व यंत्रणा हाताळली. याचे श्रेय पोलीस खात्याला नगरपालिका तहसील देवस्थान व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांना द्यावे लागेल.

भक्तांच्या गर्दीसोबत चारचाकी वाहनांची प्रचंड गर्दी झाल्यामुळे अक्कलकोट शहराच्या क्षमतेची परीक्षा पाहिली जात होती. मिळेल त्या ठिकाणी वाहनचालक वाहने पार्किंग करीत होती मात्र पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे कुठेही वाहतूक कोंडी झाली नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.