महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेमार्फत (Maharashtra State AIDS Control Organisation) ‘एआरटी’ केंद्र चालवले जाते.
सांगली : जिल्ह्यात आठ वर्षांत (AIDS) रुग्णांची संख्या घटली आहे. ‘एआरटी’ औषधांमुळे एड्सबाधितांना नवे आयुष्य लाभत आहे. २००४ मध्ये बाधितांची टक्केवारी २४.७७९ होती. ती २०१९ मध्ये ०.७१२ इतकी झाली. आजच्या स्थितीत जिल्ह्यात १० हजार ९०० रुग्ण आजारासह जगत आहेत. त्यांतील अनेकांचे विवाह झाले आहेत. त्यांची मुले संसर्गमुक्त आहेत, हे विशेष. एआरटी केंद्रांसह सामाजिक कार्यकर्ते, संस्था, परिचारिकांच्या प्रयत्नाने जिल्ह्यात रुग्णांची संख्या घटतेय, हे सुचिन्ह आहे.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेमार्फत (Maharashtra State AIDS Control Organisation) ‘एआरटी’ केंद्र चालवले जाते. मिरजेत दोन, सांगलीसह इस्लामपुरात एक अशी चार केंद्रे कार्यरत आहेत. बाधितांची मोफत तपासणी करून, औषधोपचार केले जातात. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण घटत आहे. २००१ मध्ये ऐच्छिक तपासणी व मोफत सल्ला केंद्राची सुरवात झाली. पूर्वी फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी असलेली ही केंद्रे आता तालुकास्तरापर्यंत कार्यरत आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्रांसह खासगी रुग्णालयांच्या मदतीने गावोगावी सर्व वयोगटांतील लोकांची तपासणी करून चाचणीपूर्व समुपदेशन केले जाते. त्यांची संमती असल्यास एचआयव्ही तपासणी करून चाचणी पश्चातही समुपदेशन होते. पुढील मोफत उपचारासाठी एआरटी केंद्राकडे पाठवले जाते. गर्भवती माता एचआयव्हीबाधित आढळल्यास संपूर्ण कुटुंबाची तपासणी केली जाते. तिच्या बाळाला एचआयव्ही होऊ नये म्हणून तिच्यासह बाळावर औषधोपचार केले जातात.
बालकांना संसर्ग रोखणे शक्यएचआयव्ही संसर्गित महिलेचे गर्भधारणेनंतर समुपदेशन करून चाचणी सकारात्मक आल्यास औषधोपचार केले जातात. प्रसूतीनंतर बाळाचे संगोपन, आहाराबाबत समुपदेशन केले जाते. बाळाला एचआयव्हीची बाधा न होण्यासाठी समुपदेशन व उपचार केले जातात. पालकांनी सूचनांचे योग्य पालन केल्यास बालकांना होणारा संसर्ग पूर्णपणे रोखता येतो. औषधातील सातत्याने एचआयव्हीचे संक्रमण कमी होते. रुग्णांना दरमहा मोफत औषधे देऊन सहा महिन्यांतून एकदा तपासणी होते. आहारासोबतच काय काळजी घ्यावी, याविषयी सल्ला दिला जातो. वृद्ध रुग्णांना राज्य शासनातर्फे संजय गांधी निराधार योजनेतून पेन्शन दिली जाते. बाल संगोपन योजना, अंत्योदय योजना, अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यात येतो.
डायलिसीस मशीन, हेल्पलाईन अन् विवाहसंसर्गित रुग्णास गरजेनुसार डायलिसीस मशीनची गरज असते. खासगी रुग्णालयात भरमसाठ पैसे भरून तपासणी करावी लागते. त्याचा भुर्दंड रुग्णांना बसू नये यासाठी अतिरिक्त मशीन जिल्हा प्रशासनानाने मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दिली आहे. नवीन डायलिसीस मशीनसाठी २२ लाख ९० हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मोबाईल वा दूरध्वनीवरून १०९७ हेल्पलाईन क्रमांकाद्वारे आजाराबाबत मोफत माहिती दिली जाते. संसर्गित मुला-मुलींसाठी वधू-वर परिचय मेळावाही घेण्यात येतो. त्यातून अनेकांचा विवाह होऊन संसारवेली फुलल्या आहेत.
जिल्ह्यात आजघडीला ११ हजार रुग्ण एड्सबाधित आहेत. औषधोपचार, चाचणी, समुपदेशनाच्या मदतीने बाधित सामान्य जीवन जगत आहेत. एड्सबाधित पाल्यांची बालके एड्समुक्त जन्म घेताहेत, हेच एआरटी योजनेचे यश आहे. औषधोपचाराने संक्रमण कमी होते. औषधाने शरीरातील पांढऱ्या पेशींची संख्या वाढते. एड्स विषाणूंची संख्या कमी झाल्यामुळे रुग्णांना जगण्याचे बळ मिळत आहे.
-विवेक सावंत, जिल्हा एड्स नियंत्रण अधिकारी, सांगली
दृष्टिक्षेपात जिल्ह्यातील एड्सबाधित वर्ष तपासणी केलेली संख्या रुग्ण संख्या टक्केवारी२००४ १८०८ ४४८ २२.७७९
२००५ २८५५ ५२१ १८.२४९
२००६ ६४९९ २२५८ ३४.७४४
२००७ १४,७९३ ३०४१ १५.४३८
२००८ १९,९८३ ३०८५ १५.४३८
२००९ २९,२५७ ३१८६ १०.८९०
२०१० ३७३२० ३२१३ ८.६०९
२०११ ३९४६० २५५२ ६.४६७
२०१२ ४१९२२ २२११ ५.२७४
२०१३ ५५८०१ १९०८ ३.४१९
२०१४ ६७७५९ १५८० २.०९५
२०१५ ६६९८१ १४०३ २.०९५
२०१६ ७४३३७ ११४६ १,५४२
२०१७ ७६७६४ १०२६ १.३३७
२०१८ ८०३०४ ८३१ १.०३५
२०१९ ११४६९७ ८१७ ०.७१२
२०२० ६९,८०० ४८८ ०.६९९
२०२१ ८२७२२ ४६० ०.५५६
२०२२ १०६५०२ ६०७ ०.५७०
२०२३ १०८६१४ ५०४ ०.४६४
२०२४ १०९६४१ ४४० ०.४०१
एकूण १२,०७,८१९ ३२,२२५ २.६६८