Maharashtra Weather Update: राज्यावर गेल्या काही दिवसांपासून असलेले अवकाळी पावसाचे सावट दूर झाले आहे. अवकाळी पावसाचे सावट टळले असले तरी नवीन वर्षात पुन्हा थंडीची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातून थंडी गायब झाली होती. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली होती. मात्र, आता थंडी पुन्हा परतली असून राज्याच्या किमान तापमानात घट होत आहे. पुढच्या काही दिवसात थंडीची ही लाट तीव्र होण्याची शक्यता आहे.
राज्यात गेल्या 15 दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहे. कधी मुसळधार पाऊस, काधी गारपिटीचे संकट तर कधी ढगाळ वातावरण अशी परिस्थीती आहे. हवामानाच्या या बदलामुळे या कालावधीत थंडीचा जोर ओसरत किमान तापमानात वाढ झाली होती. काही भागात तर अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. अशात, शेतकऱ्यांना अवकाळी पावसाच्या समस्येपासून दिलासा मिळणार आहे. राज्यात अवकाळी पावसाचे संकट दूर होत आता पुन्हा थंडीचा जोर वाढणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी याची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे.