ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. उभयसंघातील पाचवा आणि अंतिम सामना हा सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे होणार आहे. ऑस्ट्रेलिया या 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी पाचवा सामना हा अटीतटीचा आहे. तसेच टीम इंडियाला मालिकेत बरोबरी करण्यासाठी हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलिया 3-1 ने मालिका विजय मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे. ऑस्ट्रेलियाने या सामन्यासाठी काही तासांआधीच प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलियाने प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 बदल केला आहे. ऑस्ट्रेलियाने मिचेल मार्शला डच्चू देत युवा ब्यू वेबस्टर याला संधी दिली आहे.
ब्यू वेबस्टर हा कसोटी पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. ब्यू वेबस्टर या मालिकेतून कसोटी पदार्पण करणारा ऑस्ट्रेलियाचा दुसरा खेळाडू ठरणार आहे. याआधी सॅम कॉनस्टास याने पदार्पण केलं होतं. ब्यू वेबस्टर ऑस्ट्रेलियासाठी कसोटी पदार्पण करणारा 469 वा खेळाडू ठरणार आहे. या उंचपुऱ्या खेळाडूची देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगरी राहिली आहे.
ब्यू वेबस्टर याने 93 फर्स्ट क्लास सामन्यातील 159 डावांमध्ये 12 शतकं आणि 24 अर्धशतकांसह 5 हजार 297 धावा केल्या आहेत. तसेच 142 डावांमध्ये 148 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियासमोर या डेब्यूटंटला रोखण्याचं आव्हान असणार आहे.
पाचव्या टेस्टसाठी ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रेव्हिस हेड, ब्यू वेब्स्टर, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि स्कॉट बोलँड
बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.