गौरी देशपांडे editor@esakal.com
मी वर्गाच्या एका कोपऱ्यात वेगळे बसायचे : ‘असं का?’
इतर मुलांप्रमाणे मी मात्र नळाचे पाणी प्यायचे नाही : ‘असं का?’
माझ्या पुस्तकांना गुरुजी कधीच हात लावत नाहीत : ‘असं का?’
छोट्या भीमच्या कोवळ्या मनाने टिपून घेतलेल्या या गोष्टी आणि
‘असं का?’ हा त्याला पडलेला प्रश्न...ही सुरुवात होती एक महामानव घडण्याची!
‘भीम ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या प्रवासाची ही गोष्ट उलगडली गेली आहे ‘ ‘असं का’ विचारणारा मुलगा’ या पुस्तकातून. (कथा : सौम्या राजेंद्रन, चित्रे : सात्त्विक गादे, अनुवाद : वसुधा आंबिये, प्रकाशक : तुलिका प्रकाशन, मूल्य : १७५ रुपये).
लहानग्या भीमाला पडलेल्या ‘असं का?’ या प्रश्नाचा धागा पकडून आपण त्यांच्या आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे वाचत जातो. या समाजव्यवस्थेच्या उतरंडीमधले आपले स्थान हे सगळ्यात खालचे आहे हे लहानपणीच भीमाला जाणवले होते. थोडा मोठा झाल्यावर जेव्हा त्याच्या लक्षात आले की, आपण ‘महार’ जातीचे आहोत - म्हणजे अस्पृश्य आहोत...ज्यांना स्पर्शही करायचा नाही अशा जातीचे आहोत - तेव्हा पहिल्यांदा हे प्रश्नचिन्ह त्याच्या मनात उमटले.
आणि मग स्थळ-काळ-संदर्भ बदलत गेले तरी या प्रश्नाने त्याची पाठ सोडली नाही. शाळेतल्या कोणत्याही पुस्तकाला हात लावण्याची मनाई असो, बैलगाडीतून जाताना गाडीवानाने शेजारी बसायला दिलेला नकार असो की परदेशातून शिक्षण घेऊन परातल्यावरसुद्धा राहण्यासाठी जागा मिळवताना झालेला त्रास असो - त्यांचे ‘खालच्या जातीचे’ असणे अशा अनेक कटू अनुभवांतून अधिकाधिक अधोरेखित होत गेले. त्यांची बुद्धिमत्ता, ज्ञान, कौशल्य यांपेक्षा त्यांची जातीची ओळखच वरचढ ठरू लागली आणि त्याचबरोबर त्याच्या मनातल्या ‘असं का?’ या प्रश्नाची धार वाढत गेली.
अमेरिकेत गेल्यावर पहिल्यांदाच स्वतःबद्दल बरोबरीची, सन्मानाची वर्तणूक अनुभवल्यानंतर ‘आपल्याला आजपर्यंत मिळत आलेली वागणूक ही किती अन्यायकारक होती’ हे अधिक प्रकर्षाने त्यांना जाणवले आणि ‘असं का?’ तला भाबडेपणा जाऊन एका अन्याय्य - जाचक अशा समाजव्यवस्थेवर चिडून तिला जाब विचारणारा तीव्र संताप त्या ठिकाणी जागा झाला. जातिभेदाविषयीचा असंतोष डॉ. आंबेडकरांनी वेळोवेळी आपल्या भाषणांतून, लिखाणातून व्यक्त केला. जातिप्रथा आणि तीमुळे होणारे दुष्परिणाम याविषयी लेखन केले.
आपल्यालाही या जगात जगण्याचा, शिक्षण घेण्याचा, काम मिळवण्याचा तेवढाच अधिकार आहे हे ‘हीन’ समजल्या गेलेल्यांना सांगून, त्यांना अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची प्रेरणा दिली. हळूहळू, इतकी वर्षे अज्ञानाच्या, दारिद्र्याच्या अंधारात खितपत पडलेला समाज जागा होऊ लागला.
हा लढा लढण्यासाठी त्यांनी वापरलेले शस्त्र म्हणजे शिक्षण. लोकांना न्याय मिळवून देता यावा यासाठी त्यांनी लंडनला जाऊन कायद्याचे शिक्षणदेखील घेतले. एक व्यक्ती शिकते म्हणजे ती फक्त साक्षर होत नाही तर तिच्या विचारांच्या कक्षा रुंदावतात. ती केवळ स्वतःच नव्हे तर आपल्याबरोबर इतर अनेकांना पुढे नेते. हाच तर शिक्षणाचा मूळ हेतू, नाही का? डॉ. आंबेडकरांनी घेतलेले शिक्षण तर असंख्य लोकांना वरदान ठरले!
अशी ही बालवाचकांशी संवाद साधणारी, सहज-सोप्या भाषेत लिहिलेली भीमराव आंबेडकर या असामान्य व्यक्तीची जीवनकथा!
एका ‘असं का?’मुळे फक्त महाडमधल्या चवदार तळ्यातले पाणीच नव्हे तर, सन्मानाने जगण्यासाठीचे अनेक मार्ग लोकांसाठी खुले झाले!
तरीही मुलांच्या मनात येणारे असे अनेक प्रश्न दाबून टाकण्याची चूक कळत-नकळत आपल्याकडून घडत असते. एकीकडे मुलांच्या वैज्ञानिक कुतूहलाला आपल्याकडून उत्तेजन दिले जाते. ‘मोठा होऊन ही/हा नक्की मोठा शास्त्रज्ञ होणार’ असेही आपण कौतुकाने म्हणतो; पण वर्गातल्या ‘त्या’ मुलाबद्दल - ज्याचे बूट फाटलेले असतात त्या मुलाबद्दल, आपल्याकडे काम करण्याऱ्या मावशींबद्दल, दुकानात काम करणाऱ्या आपल्याच वयाच्या मुलाबद्दल विचारलेल्या प्रश्नांना मात्र अपुरी, त्रोटक, ‘तुला कशाला नसत्या चौकश्या?’ असे म्हणून दुर्लक्षच करणारी, ‘तुझी जुनी खेळणी मावशींच्या बंटीला दे हं...गुड बॉय!’ अशी सहानुभूतीची झालर असणारी आणि कधी कधी तर ‘तू अभ्यास केला नाहीस तर मोठेपणी अशीच कामं करावी लागतील तुला’ अशी क्रूर आणि असंवेदनशील उत्तरे देतो.
आयुष्याच्या ‘हार्श रिॲलिटीज्’पासून मुलांचे भावविश्व सतत सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नात आपण त्यांना ‘इग्नोरंट’ बनवतोय का?त्यांच्यातल्या संवेदनशीलतेला डिस्करेज करतोय का? या व्यवस्थेचे चांगले-वाईट नियम, तिचे खरे रूप, आपला प्रिव्हिलेज याची जाणीव असण्यासाठी आपल्या सुरक्षित दुनियेबाहेरच्या जगाची ओळख व्हायला हवी. तिच्याकडे बघण्याची चौकस, विचारी आणि संवेदनशील वृत्ती मुलांच्या ठायी निर्माण व्हावी आणि त्यासाठी अशी पुस्तके, अशा गोष्टी फार मोलाच्या आहेत, असे मला वाटते.
तसे प्रश्न तर मावशींच्या बंटीलाही पडत असतीलच की! पण त्याच्या आई-बाबांना त्याला उत्तरे द्यायची उसंत तरी मिळत असावी का? ती मिळालीच तरी ‘आपल्या नशिबात मोठी स्वप्ने पाहणे नाही’ अशी आणि यांसारखी उत्तरे मिळण्याची शक्यता जास्त. अशा अनेक ‘बंटीं’च्या मनात स्वप्ने बघण्याचा - ती पूर्ण करण्याचा आणि आपले नशीब आपण स्वतः घडवू शकतो याविषयीचा विश्वास डॉ. आंबेडकरांनी निर्माण केला! मुळातच मुलांची निरीक्षणशक्ती अफाट असते.
अनुकरण करण्याचा त्यांचा स्वभाव असतो. शंभर प्रश्न रोज मनात निर्माण होत असतात. त्यामुळे आजच्या काळात, जिथे आंबेडकरजयंती अथवा महापरिनिर्वाणदिन हे दिवस फक्त सुट्टीशी, सेलिब्रेशनशी जोडण्यापुरतेच मर्यादित होऊ लागले आहेत त्या काळात, ‘असं का’ हे विचारणारा मुलगा’ हे पुस्तक जे प्रश्न उपस्थित करण्याची प्रेरणा आपल्याला देते, ते मुलांच्या हाती पडणे फार गरजेचे आहे; फक्त मुलांच्याच नव्हे तर, त्यांचे पालक आणि शिक्षक यांच्यासुद्धा ते हाती पडायला हवे.
साजरे नक्की काय करायचे? हा उत्सव आहेच; पण तो एका व्यक्तीपेक्षाही त्याच्या विचारांचा आहे, समानतेच्या त्याच्या आग्रहाचा आहे, जातिवाद समूळ नष्ट करण्याच्या त्याच्या ध्येयाचा आहे, प्रत्येक माणसाला सन्मानाने जगता यावे यासाठीच्या त्याने पुकारलेल्या लढ्याचा आहे आणि सरतेशेवटी ‘असं का?’ विचारण्याची हिंमत दाखवून त्या प्रश्नाचा पाठपुरावा करण्याच्या चिकाटीचा आहे. पुस्तकात शेवटी एक वाक्य आहे, ‘हा लढा संपलेला नाही...आजही तो सुरू आहे’ आणि त्यावर आपल्या सगळ्यांसाठी विचारलेला एक प्रश्न आहे...‘असं का?’