एक उत्तम राजकीय थरारपट!
esakal January 05, 2025 09:45 AM

पोलिसांवर बेतलेले बरेचसे हिंदी सिनेमे आपल्याला कायम पाहायला मिळतात. त्यात पोलिसांचे उदात्तीकरण बऱ्याच प्रमाणात केलेले असते. मल्याळम व तमिळ सिनेमाकडे गेल्यावर मात्र या गृहितकाला छेद दिल्याचे पाहायला मिळते. वेट्री मारण या दिग्दर्शकाचे कामही याच धर्तीवरील आहे. त्याच्या ‘विसरणाई’ (२०१५) या चित्रपटात पोलिसांची क्रूरता, जातीचे राजकारण हे मुद्दे केंद्रस्थानी होते. हाच दिग्दर्शक ‘विडुदलै’ नावाचा दोन भागांचा चित्रपट समोर घेऊन आला आहे.

‘विडुदलै’ १९८०च्या दशकाच्या उत्तरार्धात घडतो. एका रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची सुरुवात होते. हा अपघात तिथल्या एका क्रांतिकारी अतिरेकी गटाने घडवून आणल्याचा संशय सरकार आणि पोलिसांना असतो. त्यामुळे सरकार ‘ऑपरेशन गोस्टहंट’ नावाची एक मोहीम सुरू करते.

या मोहिमेचा उद्देश असतो तो म्हणजे या अतिरेकी गटाच्या म्होरक्याचा शोध घेणे. त्याचदरम्यान, कुमारेसन (सूरी) नावाचा एक हवालदार एका पोलिसांच्या तुकडीत रुजू होतो. त्याचं पोस्टिंग वरचा सगळा घटनाक्रम ज्या भागात घडतो तिथेच झालेले असते. संवेदनशील मनाचा कुमारेसन ज्या बऱ्यावाईट गोष्टी पाहतो, अनुभवतो, त्यांचे चित्रण चित्रपटाच्या कथेच्या केंद्रस्थानी येते.

यात भ्रष्टाचार, पोलिसांची अमानुषता, क्रूर, हिंसक आणि खुनशी मानसिकता यांचे चित्रणही येते. मग घडलेल्या घटनांमध्ये कसा हस्तक्षेप करायचा, एक माणूस म्हणून सगळ्या गोष्टींकडे कशा रीतीने पाहावे, इत्यादी द्वंद्व त्याच्या मनात घडून येते.

यासोबतच कुमारेसन जवळच्याच एका गावातील मुलीच्या प्रेमात पडतो. त्यामुळेही त्याच्या मनातील, आयुष्यातील व पर्यायाने चित्रपटातील गुंता वाढत जातो. त्यामुळे चित्रपटाचे स्वरूप एका कॅरेक्टर स्टडीचे आहे; पण ही एक बळकट राजकीय कंगोरा असलेली कॅरेक्टर स्टडी आहे.

कथानक, कथन, अभिनय, इलायीराजाचे संगीत, प्रकाशचित्रण अशा साऱ्याच बाजू चित्रपटात उत्तम दर्जाच्या आहेत. वेट्री मारण गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने उत्तम कामगिरी करणारा दिग्दर्शक आहे. दर चित्रपटागणिक त्याच्या दिग्दर्शकीय कौशल्यात घडणारे बदल आणि वाढ पाहायला मिळते. उदाहरणार्थ, ‘विडुदलै : भाग एक’च्या सुरुवातीकडील लांबलचक प्रसंग पाहावा. त्यात संगीत, नटसंच, प्रकाशचित्रण यांमध्ये जो समन्वय घडवून आणलेला आहे, त्यातून वेट्री मारणची उत्कृष्ट कामगिरी सिद्ध होते.

‘विडुदलै’चा अर्थ होतो स्वातंत्र्य; पण हे स्वातंत्र्य केवळ क्रांतिकारी चमू किंवा त्यांच्या समर्थकांच्या मनातील भावना अधोरेखित करीत नाही. त्यात स्वातंत्र्याचा एक व्यापक अर्थही दडलेला आहे. सत्तेच्या गैरवापराचे यथार्थ चित्रण आणि टीकाही त्यात येते. ही सत्ता पोलिसांच्या हातातली असल्याने पोलिसी खाक्याचे गडद, तपशीलवार चित्र समोर उभे केले जाते.

याखेरीज चित्रपटात येणारे एकूणच राजकीय सूक्ष्म कंगोरेदेखील बारकाईने लक्षात घ्यावेत असे आहेत. वेट्री मारणच्या चित्रपटांत असणारे भक्कम राजकीय मते इथेही असल्याने चित्रपट एक उत्तम राजकीय थरारपट बनतो. ‘विडुदलै’च्या पहिल्या भागानंतर आता दुसरा भागही झी ५वर आला आहे. हे दोन्ही भाग उपलब्ध असल्याने एका महत्त्वाच्या दिग्दर्शकाचे हे महत्त्वाकांक्षी चित्रपट नक्की पाहावेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.