अहिल्यानगर : आंतर महाविद्यालयीन विभागीय मल्लखांब स्पर्धेत महिला खेळाडूवर अन्याय झाला असून, पंचांनी एकतर्फी निर्णय देऊन खेलो इंडियातील पदक विजेत्या मल्लखांबपटूला डावलल्याची तक्रार या खेळाडूने केली आहे. आपल्यावरील अन्याय दूर करून न्याय देण्याची मागणीही करण्यात आली आहे. मल्लखांबपटू गौरी गौड हिने आपला तक्रार अर्ज प्राचार्यांच्या नावे दिला आहे.
तक्रारीत म्हटले की, शनिवारी आंतर महाविद्यालयीन विभागीय मल्लखांब स्पर्धा पेमराज सारडा महाविद्यालयात आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत निवड समिती विद्यापीठाकडून गठित करण्यात आली, त्यामध्ये ठरावीक एकाच शहरातील व्यक्तींची नियुक्ती केली होती, तर भारतीय मल्लखांब महासंघाच्या नियमावलीनुसार निवड समिती सदस्य स्पर्धेत पंच म्हणून कामकाज करू शकत नसताना या स्पर्धेमध्ये निवड समितीतील सदस्य पंच म्हणून पंच मंडळामध्ये काम करत होते. जिल्ह्यातील आमंत्रित राष्ट्रीय पंचांना पंच मंडळात डावलण्यात आले.
या स्पर्धेत भारतीय मल्लखांब महासंघाच्या नियम नियमानुसार पंच मंडळामध्ये किमान सात पंच असतात, ज्यामध्ये एक पंच प्रमुख, चार सहायक पंच, दोन गुणलेखक असे पंच मंडळ आवश्यक आहे. परंतु या स्पर्धेत केवळ तीन पंच आणि एक गुणलेखक, असे चार पंच मंडळ तयार केले होते. विद्यापीठ प्रतिनिधींनी नियमबाह्य कामकाज का केले, असा प्रश्न निर्माण होत आहे.
गौरी गौड ही उत्तम खेळाडू असून, तिने गेल्या वर्षी खेलो इंडिया स्पर्धेत पदक पटकाविले होते. पंच मंडळामध्ये एकाच जिल्ह्यातील पंच होते. पंचांनी एकतर्फी निर्णय देऊन या गरीब खेळाडूवर अन्याय केला आहे. त्यामुळे आम्ही विद्यापीठ गुलगुरू यांच्याकडे दाद मागितली आहे.
-प्रणिता तरोडे, प्रशिक्षक
विद्यापीठ प्रतिनिधींची चुकीची उत्तरेपंच मंडळाकडून झालेल्या अन्यायाविरोधात खेळाडू आणि प्रशिक्षक दाद मागण्यासाठी गेल्यानंतर विद्यापीठ प्रतिनिधीने त्यांचा अर्ज स्वीकारलाच नाही, उलट खेळाडू व प्रशिक्षकांना चुकीची उत्तरे दिली आणि संबंधितांना तुमचा अक्षेप अर्ज विद्यापीठात घेऊन या, असे सांगितले.
अन्यथा निवासी आंदोलनआंतर महाविद्यालयीन विभागीय मल्लखांब स्पर्धा नियमबाह्य पद्धतीने घेण्यात आल्या असून, संबंधित खेळाडूला न्याय द्यावा, तसेच स्पर्धा पुन्हा घेऊन खेळाडूंवरील अन्याय दूर करावा; अन्यथा १ जानेवारीला खेळाडू, प्रशिक्षक व पालकांसह कुलगुरूंच्या दालनासमोर निवासी आंदोलन करण्याचा इशारा, स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी संघटेने राहुल भागवत यांनी दिला आहे.