अवघ्या 10 मिनिटांत पोहोचणार रुग्णवाहिका, Blinkit ची नवीन सेवा
Marathi January 03, 2025 02:25 PM

ब्लिंकिटने रुग्णवाहिका सुरू केली: क्विक कॉमर्स वेबसाईट ब्लिंकिटने अलिकडे बाजारपेठ चांगलीच काबीज केली आहे. सध्या बहुतेक जण ब्लिंकिट डिलिव्हरी ॲपवरुन घरातील सामान मागवतात. आता ब्लिंकिटने आणखी एक सेवा सुरु केली आहे. ब्लिंकिटने आता ’10 मिनिटांत रुग्णवाहिका’ ही नवीन सेवा सुरु केली आहे. गुडगाव शहरात ब्लिंकिटकडून ही सेवा सुरु करण्यात आली आहे. ब्लिंकिटचे सीईओ अल्बिंदर धिंडसा यांनी गुडगाववासियांसाठी ’10 मिनिटांत रुग्णवाहिका’ सेवेची घोषणा केली आहे. यानुसार, आता ब्लिंकिट युजर्स आता आपत्कालीन परिस्थितीत फक्त 10 मिनिटांत रुग्णवाहिका सेवा ऑर्डर करू शकतील.

अवघ्या 10 मिनिटांत पोहोचणार रुग्णवाहिका

ब्लिंकिटची ही रुग्णवाहिका सेवा सध्या गुरुग्राम शहरामध्ये सुरू करण्यात आली आहे. लवकरच ब्लिंकिट देशातील इतर प्रमुख शहरांमध्ये या योजनेचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात असल्याचं ब्लिंकिटचे सीईओ अलबिंदर धिंडसा यांनी सांगितलं आहे. शहरांमध्ये अनेक वेळा अपघातग्रस्तांना वैद्यकीय मदत वेळेवर मिळत नाही. ही समस्या दूर करण्यासाठी ब्लिंकिटने हे मोठं पाऊल उचलल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. 10 मिनिटांत रुग्णवाहिका सेवेअंतर्गत आता लोक ब्लिंकिटवरुन रुग्णवाहिका मिळवू शकतील. अवघ्या 10 मिनिटांत रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचेल.

अपघातग्रस्तांसाठी ब्लिंकिटची नवीन सेवा

शहरांमध्ये ‘जलद आणि विश्वासार्ह रुग्णवाहिका’ सेवा पुरवण्यासाठी ब्लिंकिट कंपनीचं हे पहिलं पाऊल असल्याचं सीईओ अल्बिंदर धिंडसा यांनी सांगितलं आहे. याचा एक भाग म्हणून गुरुग्राममध्ये पहिल्या पाच रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत, या रुग्णवाहिका लोकांच्या सेवेसाठी तत्पर असतील.

एक्स पोस्टद्वारे दिली माहिती

सीईओ अल्बिंदर धिंडसा यांनी यांसदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करत लिहिलं आहे, “आम्ही आमच्या शहरांमध्ये जलद आणि विश्वासार्ह रुग्णवाहिका सेवा पुरवण्याच्या समस्येचे निराकरण करण्याच्या दिशेने आमचे पहिले पाऊल टाकत आहोत. गुरुग्राममध्ये आजपासून पहिल्या पाच रुग्णवाहिका रस्त्यावर येणार आहेत. जसजसे आम्ही अधिक क्षेत्रांमध्ये सेवेचा विस्तार करु, तसतसे तुम्हाला बेसिक लाइफ सपोर्ट (बीएलएस) रुग्णवाहिका बुक करण्याचा पर्याय ब्लिंकिटवर दिसू लागेल”.

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.