विवेक पंडित pvivek2308@gmail.com
गावात एक पिढ्यान््पिढ्या चालत आलेला शोषित आणि शोषकांमधला सत्ता-संघर्ष होता, जो गेले अनेक पिढ्या अत्यंत शांतपणे अन् सहजतेने सुरू होता. शोषक जुलूम करीत होते आणि शोषित तो सहन करीत होते. कदाचित मीही अनाहूतपणे माझ्याही अपरोक्ष त्या शोषणाचा इतके वर्ष भाग होतो, कारण मला सुरुवातीला ही विषमता लक्षातच आली नाही. ‘हा जुलूम सहणे नाही, व्हा सज्ज संगरासाठी...’ या गाण्याने या गावातली ही विषमतेची दरी, हा संघर्ष, हा जुलूम उसळी मारून प्रतलावर आला होता.
‘कास्प’ ही संस्था काही गावांमध्ये मुलांच्या शिक्षणाचं काम करीत होती. मी आणि विद्युल्लता ‘कास्प’चं काम करीत असताना ‘कास्प’चे एक कार्यकर्ते आनंद ऊर्फ आबा धामणकर यांच्याशी आमचा परिचय झाला. ते मुंबईच्या बोरिवली-दहिसर येथे राहायचे. दहिसरला त्यांना आम्ही भेटायला गेलो तेव्हा आम्हाला कळलं, की ते आर्मीमधून सेवानिवृत्त होऊन ‘कास्प’ संस्थेमध्ये काम करू लागले होते. अत्यंत शिस्तीचे. आर्मीत नोकरी केल्याने तिथला वक्तशीरपणा, शिस्त, बोलणं-वागणं या साऱ्यातच आर्मीचे गुण उतरलेले.
पहिल्याच भेटीत त्यांचे आणि आमचे सूर चांगले जुळले, जे आबांच्या अंतापर्यंत कायम राहिले. आबांना आम्ही दहिसरमधल्या गावात घेऊन गेलो आणि त्यांनी तिथल्या मुलांना स्पॉन्सरशिप देण्याबद्दल सांगितलं. एका मुलाला एका वर्षाला तीनशे रुपये, अशी स्पॉन्सरशिप ‘कास्प’ देत असे आणि अशी तीस मुलं आम्ही निवडली, ज्यांना ‘कास्प’ने स्पॉन्सरशिप सुरू केली. या स्पॉन्सरशिपमध्ये मुलांचे कपडे, वह्या, पुस्तकं, पाटी, पेन्सिल, दप्तर, चप्पल, एवढंच काय; तर केस कापायचे पैसेसुद्धा समाविष्ट असायचे.
नंतर संघटनेत नेतृत्व करणारे अनेक कार्यकर्ते यातून पुढे आले. भारती, रंजना, प्रकाश हे यातीलच एक. भारती, रंजना यांचे आई-वडील हे दोघेही दिवसभर दारू प्यायलेले असायचे. तिच्या बाबांना अण्णा म्हणायचे. रंजनाचा बाबा दारू पिऊन रस्त्याच्या एका बाजूला पडलेला असायचा; तर आई दुसऱ्या बाजूला... त्यामुळे दारूच्या नशेत घराची धूळधाण झालेली! अशी आम्ही भारतीसारखी तीस मुलं निवडलेली होती.
त्यात प्रकाश वैती याचाही समावेश होता. त्यात ‘जात’ हा निकष आम्ही कशावर लावलेला नव्हता. गरिबी आणि त्यात जर आदिवासी असतील तर प्राधान्य हाच निकष होता. त्यामुळे आम्ही स्वाभाविकच आदिवासी, दलित आणि वैती म्हणजे आगरी समाज. या तिन्ही समाजातली मुलं आणि मुली स्पॉन्सरशिपमध्ये घेतल्या होत्या. प्रकाश वैती जसा होता, तसाच रवी खारवी हा एक होता आणि दुसरा भालचंद्र धुळे.
भालचंद्र ज्याला भाल्या म्हणत, तो जवळपास अंध होता. धुरकटसारखं त्याला दिसत असावं; परंतु तो अंध होता आणि त्याचसोबत तो अपंगही होता. एक डोळा पूर्ण झाकलेला, एक पाय वाकडा झालेला आणि हातात आधाराकरिता काठी. दारिद्र्याचे सारे अलंकार लेवून तो हसतमुख चेहऱ्याने काठीच्या आधारे वावरे. अंधत्व आणि अपंगत्वाचं जीवनाने दिलेलं दान त्याने अत्यंत सहजतेने स्वीकारलं होतं; परंतु तो अतिशय तल्लख, चाणाक्ष होता.
वाद्य वाजवण्यात तो अत्यंत माहीर. ढोलकी खूप छान वाजवायचा. ढोलकीच्या खणखणीत बाजासारखाच त्याचा उत्साह नि आनंद. याच स्पॉन्सरशिपच्या कार्यक्रमात नंतर पुढे जाऊन प्रकाश, रवी हे गावचे कार्यकर्ते झाले. भारती पुढे लग्न झाल्यानंतर अनिता धांगडा झाली, जी नंतर जिल्हा परिषद सदस्य आणि नगरसेविकाही झाली. तेव्हा त्या मुलांना या स्पॉन्सरशिपअंतर्गत शिक्षणात जी मदत केली, त्या मदतीचा असा एक फायदा त्या मुलांना भविष्यात झाला. भाल्या आज साठीचा आहे.
दहिसर गावातच राहतो. मी त्याला भेटायला गेलो असता तो कामाला गेल्याचं कळलं. तो शरीराने अंध आणि अपंग असूनसुद्धा कामाला गेला, याचं मला कौतुक वाटलं. त्याला आणायला मी माझी गाडी पाठवली आणि घेऊन आलो. तो नेहमीच हसतमुख. शारीरिक अपंगत्वाची एकही वेदना त्याच्या प्रसन्न चेहऱ्यावर नसे...
मी त्याला विचारलं, ‘काय भाल्या, कसं काय?’
म्हणाला, ‘हो, भाऊ तू आलास तर कामावरून आलो मी निघून. मॅनेजरला सांगितलं, भाऊ आला आहे माझा.’ अत्यंत आपुलकीने भाल्या सांगत होता.
‘तू कसा आहेस?’ विचारल्यावर तो म्हणाला, ‘एकदम खूश.’
‘काय करतोस तू?’ ‘भांड्यांना पावडर लावतो भाऊ. मग भांडी बफिंग करायचं काम करतो.’ ‘भाल्या, पैसे किती मिळतात रे?’ तर म्हणाला, ‘भरपूर मिळतात... आठवड्याला सातशे-आठशे रुपये मिळतात’... आठवड्याला सातशे-आठशे इतके तुटपुंजे मिळून त्यावरही तो समाधानी होता. ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असो द्यावे समाधान’ हे तत्त्वज्ञान त्याने प्रत्यक्ष त्याच्या आयुष्यात उतरवलेले होते.
लिहिता-वाचता येत नसल्याने तुकारामांचं साहित्य वाचावं तर दुरापास्तच होतं भाल्याकरिता... तरीही तुकारामांनी सांगितलेलं अध्यात्म न वाचताच तो वास्तवात जगत होता. आठवड्याला सातशे-आठशे रुपये मिळूनसुद्धा हा माणूस अतिशय आनंदी आहे आणि आपल्या अपंगत्वाची कोणतीही सबब पुढे न करता तो काम करीत राहतोय याचा त्याला आनंद आहे. मलाही त्याला बघून खूप आनंद झाला. ‘कसा आहेस रे तू?’ असं विचारल्यावर ‘असा काय भाऊ... आपण कधीच नाराज नाय. आपण नेहमीच खूश असतो’ असं तो म्हणाला. भाल्या हा माझ्या दृष्टीने आनंदाच्या अखंड स्मृतीचा झरा आहे.
जेव्हापासून मी भाल्याला ओळखतोय, तेव्हापासून भाल्या कसा आहेस? असं विचारल्यावर हेच म्हणत आलाय... ‘आपण आनंदीच आहोत कायम. भाऊ, आपल्याला काय कमी आहे? आपल्याला कायच कमी नाय...’ निसर्गाने शरीराचे दान देताना घेतलेला आखडता हातही त्याला मुळीच बोचत नव्हता. भाल्या खरं तर व्यावहारिकदृष्ट्याही कफल्लक... तरीही त्याला कायमच संपन्न वाटत आलंय. खरं अध्यात्म भाल्याने ओळखलंय. भाल्यासह सर्वच जे या स्पॉन्सरशिपमधले विद्यार्थी होते, ते संघटनेच्या पुढच्या लढ्यामध्ये सैनिक म्हणून कामाला आले.
आम्ही लग्नापूर्वीच गावाकडे जायचा विचार केला होता आणि दहिसरला गेलो होतो. तेही ग्रामविकासाच्या काही स्वप्नाळू कल्पना घेऊनच. दहिसर गावामध्ये बांबूपासून चटया बनवणं, बांबूच्या टोपल्या बनवणं, असा व्यवसाय तिथल्या महिला करायच्या. या महिलांचं उत्पन्न वाढावं म्हणून काही करता येईल का? असा आम्ही विचार करीत होतो. सोनीबाई धुळे ही एक तिथली नेतृत्वगुण असलेली ज्येष्ठ महिला होती. आम्ही तिला विचारलं. की ‘सोनीबाई, उत्पन्न वाढवायला काय करता येईल?’ ती म्हणाली, की ‘वटारहून त्यांना मेस बांबू आणायला लागतो.`मेस बांबू म्हणजे हिरवा भरीव बांबू... त्याच्याच चटया बनत. आपणच जर हे बांबू आणले तर लोकांना खूप फायदा होईल.’
आमचं ठरलं... घाऊक बांबू आणायचा अन् इथल्या महिलांना स्वस्तात द्यायचा. पुढे हेच सहकारी तत्त्वावर चालत राहील, अशी कल्पना होती. म्हणून आम्ही त्यांची ‘बुरूड सोसायटी’ बनवली आणि सोनीबाईला त्याचं अध्यक्ष केलं. पहिल्यांदाच बांबू आणणार होतो, त्यामुळे मग बांबू कुठून आणायचे? तर त्यांच्यातल्या एकाला घेतलं आणि या बुरूड सहकारी सोसायटीचा सचिव ज्याने आम्हाला जागा दिली होती तो बाबू भोईर, त्याच्या मुलालाच आम्ही सचिव केलं होतं. असा तो, मी आणि रायगडचे जोशी नावाचे एक गृहस्थ जे बांबूचे माहीतगार होते, त्यांना सोबत घेतलं आणि आम्ही माणगावजवळच्या कोलाडला जीपने गेलो.
तिथल्या गावात बांबू खूप मोठ्या प्रमाणात होता. मी एकासोबत बांबू आणायचा सौदा केला. त्यावेळेस एकूण तीस हजारांचे बांबू आम्ही निवडले. चार दिवसांनी जेव्हा ते आमच्या गावात आले तेव्हा त्यांनी पोकळ बांबू पाठवल्याचं आमच्या लक्षात आलं. म्हणजे इमारतीच्या पराती भरायला किंवा बांधकामाला उपयोगाला येतात तसे ते बांबू होते. हे टोपल्या बनवण्याचे बांबू नव्हतेच. थोडक्यात त्यांनी आमची फसवणूक केली होती. आम्ही पुन्हा माणगावला गेलो आणि ज्यांनी बांबू विकत दिले त्यांना जाब विचारला, की ‘तू आम्हाला फसवून बांबू का दिलेस?’ आम्हाला त्यावर उत्तर न देताच त्या वेळेला तिथले कमीत कमी पाच-पंचवीस लोक जमून आमच्यावर हल्ला करायला लागले.
खरं तर त्यांनीच आमची फसवणूक केलेली होती, तरीही आम्हाला तिथून परत निघून यावं लागलं. असा हा बांबूचा पहिला उपक्रम आमचा फसला. मग नंतर आम्ही दुसऱ्याकडून बांबू आणले. काही काळ ती बुरूड सोसायटी चांगली चालली; पण नंतर बंद झाली. खरं सांगायचं तर फार दुरदृष्टीने हा उपक्रम आम्ही सुरू केला नव्हता. टोपल्या विणणाऱ्या महिलांचं उत्पन्न रोज दहा रुपये आहे, ते पंधरा रुपये होईल अन् त्यांच्या उत्पन्नात थोडीफार भर पडेल इतका मर्यादित हेतू समोर होता आणि पुढे हाच व्यवसाय सहकारी तत्त्वावर सुरू राहील, असं आम्हाला अपेक्षित होतं, मात्र तेव्हा आमच्या असं लक्षात आलं, की सहकारी पद्धतीत फायदा झाला तर वाटा सगळ्यांचा असतो; पण तोटा झाला तर त्याचा भार कुणीच घेत नाही. हे सारं होत असतानाच त्या आठ गड्यांचा विचार एखाद्या पिशाच्चासारखा आमचा पाठलाग करीत होता.
२६ जानेवारीच्या झेंडावंदनाच्या ‘हा जुलूम सहणे नाही... व्हा सज्ज संगरासाठी...’ या गाण्याने गावामध्ये वादळापूर्वीची शांतता पसरलेली होती. झेंडावंदनानंतर आठवडाभरातीलच घटना आहे ही. आम्ही वैतरणा स्टेशनवरून दहिसरकडे येत होतो. आमच्यासोबत आमची सहकारी विषया भावे होती. ती सेवादलाच्या शाखेतली होती, ती सामाजिक कामाच्या आवडीने आमच्यासोबत यायची. ती, मी आणि विद्युल्लता आम्ही तिघे होतो. वैतरणा स्टेशनला उतरून तलाव गावाच्या रस्त्याने दहिसरकडे येत असताना अचानक मागून तीन-चार जण धावत धावत आले.
आम्ही चालत होतो आणि त्या साऱ्यांनी माझ्यावरच हल्ला केला. काही कारण न देता ते मला एकट्यालाच फक्त मारायला लागले. मग मला सोडवायला आलेल्या विद्युल्लता आणि विषयालाही त्यांनी लाथा मारल्या. आम्ही कारण विचारत होतो; पण त्यावर ते फक्त इतकंच म्हणत होते, ‘तुम्ही धडा शिकला का नाही यातून?’ त्यांनी माझे कपडे फाडले, मला जबर जखमा झाल्या. तेवढ्यात आजूबाजूचे काही लोक आले आणि त्यांनी आम्हाला सोडवलं. आम्ही दहिसरला फाटलेल्या कपड्यांनिशीच गेलो.
आम्हाला मारलं आहे, ही बातमी आम्ही गावात पोहोचायच्या आधीच पोहोचली होती. बातमी कानी पडताच त्या आठ गड्यांसह गावातले जवळपास सगळे आदिवासी ताबडतोबीने जमा झाले. मग त्यांनी आमच्या जखमा धुतल्या. आम्ही सांगितली तशी औषधं आम्हाला लावली. त्यांचे कपडेही त्यांनी आम्हाला घालायला दिले. आजवर आमच्यापासून पळून जाणारे हे सारे आम्हाला मारहाण झाल्यानंतर मात्र लगेच त्यांना आमच्याविषयी आपुलकी निर्माण झाली. आम्ही मालकांच्या बाजूचे नव्हेत, तर या आदिवासींच्याच बाजूचे आहोत, अशी खात्री त्यांना पटली. ही मारहाण आजच्या संघटनेच्या उभारणीतील पायाचा दगड ठरली.
लग्नानंतर काम करण्याचा मार्ग आम्ही निवडला. त्या वेळेस आम्हाला गावात जायचं आणि सरपंचापासून ते तळागाळातल्या मजुरांपर्यंत साऱ्यांनाच घेऊन काम करायचं अन् गावाचा सर्वांगीण विकास साधायचा, अशी ढोबळ कल्पना घेऊन आम्ही दहिसरला काम सुरू केलं होतं. त्यातूनच दवाखाना, बालवाडी यांसारखे प्रकल्प सुरू केले.
‘एक हजार कर्जासाठी, गडी जीवनभर हो कसती...
हा हिशेब सांगा कुठला, मजुरांच्या दुनियेवरती...
ही जाणीव त्यांना देऊ, अन्याया वाचा फोडू...
हा जुलूम सहणे नाही, व्हा सज्ज संगरासाठी...’
झेंडावंदनावेळीच्या या गाण्याच्या ओळी ज्या अस्वस्थतेतून अत्यंत उत्कटपणे आल्या होत्या, त्यातील अर्थाने आम्हाला जाण दिली की, गाव हे प्रशासकीयदृष्ट्या जरी एक ‘युनिट’ दिसत असलं तरी प्रत्यक्षात ते ‘एकसंध’ युनिट नाही. त्याचे अनेक स्तर यानिमित्ताने समोर आले. गावचे मालक, लोक आणि गावातले मजूर हे वर्षानुवर्षं गुण्यागोविंदाने नांदत असलेले वर वर जरी दिसत असले तरी प्रत्यक्षात त्यात एक सुप्त, अव्यक्त दरी होती... विषमतेची दरी. अन्याय करणारा आणि तो निमूट सहन करणाऱ्यातली दरी.
मामाच्या गावात सुट्टीवर येताना ज्यांच्या अंगाखांद्यावर मी मोठा झालो ते आठ गडी त्याच गावात मी काम करायला आल्यानंतर दूर पळत होते, त्यांच्या त्या अबोल्याच्या तळाशी खोल कुठेतरी या विषमतेची सल... पिढ्यानपिढ्या अन्यायाची बोच मूक होती. आम्ही दवाखाने, बालवाड्या असे प्रकल्प जोवर चालवत होतो, तोवर त्या गावच्या मालकांचं आम्हाला सहकार्य होतं, पण ‘हा जुलूम सहणे नाही व्हा सज्ज संगरासाठी’ या ओळींनी वर वर असलेल्या गावच्या शांततेच्या तळाशी असलेली जुलमी मानसिकता आणि त्यातून अडचणीत येणारे मूठभरांचे आर्थिक-सामाजिक हितसंबंध यांना बाधा पोहोचली होती.
या हितसंबंधांनाच आव्हान दिलं गेलं होतं. त्यामुळे हे मालक आमच्या विरोधात गेले होते. त्यातून एक लक्षात आलं, की गाव हे ‘एकसंध’ युनिट नसतंच त्यात अनेक स्तर असतात... जातीचे, वर्गाचे, हितसंबंधांचे... महाविद्यालयीन जीवनात कधी तरी वाचनात आलेलं अमेरिकेतील समीक्षक एडविन पर्सी व्हिपलचं एक वाक्य मला आठवलं, ‘Pretension is nothing. Power is everything’...
गावात एक पिढ्यानपिढ्या चालत आलेला शोषित आणि शोषकांमधला सत्ता-संघर्ष होता, जो गेले अनेक पिढ्या अत्यंत शांतपणे अन् सहजतेने सुरू होता. शोषक जुलूम करीत होते, सत्ता गाजवत होते आणि शोषित त्यांचा जुलूम सहन करीत होते. त्यांची अनिर्बंध सत्ता निमूट वागवत होते. कदाचित मीही अनाहूतपणे माझ्याही अपरोक्ष त्या शोषणाचा इतके वर्ष भाग होतो, कारण मला सुरुवातीला ही विषमता लक्षातच आली नाही.
या गाण्याने या गावातली ही विषमतेची दरी, हा संघर्ष, हा जुलूम उसळी मारून प्रतलावर आला होता आणि गावात काम करणं म्हणजे बालवाड्या, दवाखाने चालवणं नव्हे; तर गावा गावात खदखदत असलेल्या जुलमाविरोधात शोषिताला संघटित करणं, त्याला त्याच्या मुक्ततेसाठी आत्मविश्वास देणं... बळ देणं... तरच गाव केवळ प्रशासकीयदृष्ट्या एक युनिट न राहता ते खऱ्या अर्थाने ‘एकसंध युनिट’ होईल.
मूठभरांच्या हितसंबंधांना जोवर बाधा पोहोचत नव्हती, तोवर गावात सारं आलबेल होतं; पण जेव्हा ‘संगरा’ची भाषा उच्चारली गेली, तेव्हा याच भासमय शांततेचा डोलारा कोसळून पडला आणि पिढ्यानपिढ्यांच्या जुलमाने दाबून टाकलेला स्वातंत्र्याचा, मुक्तीचा वन्ही उसळून बाहेर आला होता... इथेच संघटनेच्या उभारणीसाठीचा ‘एल्गार’ सापडला होता.
तिथून मग आमच्या गावातल्या कामाची सगळी दिशाच बदलली. म्हणजे आमची त्या लोकांच्या मनामध्ये प्रतिमा होती, की मी मालकाच्या जवळचा, मालकाचा भाचा, मालक आमचा मामा, नातेवाईक, त्यात कदाचित माझी जात, माझा रंग... इत्यादी गोष्टी त्यांच्या मनातील माझ्याविषयीच्या प्रतिमेत भर घालणाऱ्या असाव्यात. त्यावेळेस मात्र या घटनेने त्यांच्या मनात असलेला दुरावा मिटला. एकदा आमच्या जवळ आल्यानंतर ते आयुष्यभर कधीच दुरावले नाहीत. ही मारहाण झाली नसती, तर मी कितीही समजावलं असतं त्यांना तरीही त्यांचा आमच्यावर विश्वास बसलाच नसता.
मी यातून एक शिकलो, की तुम्ही काय बोलता, याच्यावर लोक विश्वास ठेवत नाहीत; तर तुम्ही काय करता, हे लोक न्याहाळत, तपासत असतात आणि त्यावरच विश्वास ठेवतात. ज्या आठ गड्यांना बोलते करण्यास, आमच्याविषयी विश्वास निर्माण करण्याकरिता आम्ही सतत प्रयत्नशील होतो, याच आठ गड्यांसह सारे आदिवासी या मारहाणीमुळे आमच्याजवळ आले. कायमचे आमचे झाले. त्यामुळे आम्हाला मारहाणीला सामोरं जावं लागलं, यातही आम्हाला समाधान होतं... मारहाणीच्या वेदना या साऱ्यांचा विश्वास जिंकल्याच्या समाधानात कधीच पुसून गेल्या होत्या. एका अर्थाने मारहाणीच्या वेदना या संघटनानिर्मितीच्या सृजनाच्या, प्रसवाच्या वेदना ठरल्या...
‘कसा आहेस रे तू?’ असं विचारल्यावर भाल्या म्हणाला, ‘असा काय भाऊ... आपण कधीच नाराज नाय. आपण नेहमीच खूश असतो.’ भाल्या हा माझ्या दृष्टीने आनंदाच्या अखंड स्मृतीचा झरा आहे. जेव्हापासून मी भाल्याला ओळखतोय तेव्हापासून भाल्या कसा आहेस? असं विचारल्यावर हेच म्हणत आलाय... ‘आपण आनंदीच आहोत कायम. भाऊ, आपल्याला काय कमी आहे? आपल्याला कायच कमी नाय...’ निसर्गाने शरीराचे दान देताना घेतलेला आखडता हातही त्याला मुळीच बोचत नव्हता. भाल्या खरं तर व्यावहारिकदृष्ट्याही कफल्लक... तरीही त्याला कायमच संपन्न वाटत आलंय.
(लेखक सामाजिक कार्यकर्ते आणि श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आहेत.)