किशोर बळी kishorbali11@gmail.com
मराठी भाषेचे दालन विविध बोलींनी समृद्ध आहे. त्यामुळेच ती अभिजात भाषा आहे. वऱ्हाडी बोलीबद्दल तुमच्याशी संवाद साधण्याची संधी म्हणूनच मला अतिशय मोलाची वाटते. नवी पिढी आणि विशेषतः शहरांत राहणारी मंडळी ह्या बोलींपासून दूर चालली असल्याचे जाणवत असताना हा अस्सल गावरान मेवा किती लज्जतदार आहे आणि हेच आपलं वैभव आहे, याची जाणीव असणे गरजेचे आहे.
''वऱ्हाड म्हणजे सोन्याची कऱ्हाड'' असा उल्लेख आपण अनेकदा ऐकतो. कोणे एके काळी असे काही चित्र असेलही, म्हणून तसा वाक्प्रचार रूढ झाला असावा. असो. साधारणपणे पश्चिम विदर्भात म्हणजे अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ आणि वाशिम या पाच जिल्ह्यांमध्ये वऱ्हाडी बोलली जाते. आसपासच्या जिल्ह्यातही स्वाभाविकच वऱ्हाडीचा प्रभाव दिसून येतो. पूर्व विदर्भात नागपुरी बोली बोलली जाते.
मध्य प्रदेशाशी असलेल्या नात्यामुळे तिकडे जसा हिंदीचा प्रभाव अधिक दिसतो, तसा तो वऱ्हाडीवरही काही प्रमाणात आहेच. ''काय करून राह्यला बे ?'' हे ''क्या कर रहा है बे ?'' याचेच वऱ्हाडी रूप असावे. मले, तुले, येऊन राह्यला, जाऊन राह्यला, काहून बे ?, थांब नं वं मायबाई !, भयताड हाये का बे ? असे शब्द कानावर पडले म्हणजे अवतीभवती कुणीतरी वऱ्हाडी बोलत आहे, हे लक्षात येते. परंतु वऱ्हाडी बोलीचे अस्सल रूप आपल्याला कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या कीर्तनातून भेटते.
गाडगेबाबांचे शेवटचे कीर्तन बांद्रा पोलीस स्टेशनमधील कैद्यांसमोर झाले होते. त्याची सुरुवात करताना गाडगेबाबा माणसाच्या जगण्याचे प्रयोजन काय, असा प्रश्न विचारतात, ‘‘माणसाच्या जल्मात आल्यावर आपुन काय करावं ? पैसा कमावावं का बायका-पोरं पोसूनच मरावं ? का सग्या-सोयऱ्यायचा, गनागोताचा मेळ करून याच्यातच आयुष्य घालवावं ?" असे विचारत माणसातला देव ओळखा, त्याची सेवा करा, असे गाडगेबाबा सांगतात. हे वऱ्हाडी बोलीचे प्रातिनिधिक स्वरूप आहे, असे मला वाटते. या कीर्तनांमधून गाडगेबाबांनी लोकांशी साधलेला संवाद वऱ्हाडीचे खरे दर्शन घडवणारा आहे.
दे. ग. सोटे, बाजीराव पाटील, उद्धव शेळके, विठ्ठल वाघ, प्रतिमा इंगोले, सदानंद देशमुख, पुरुषोत्तम बोरकर, रमेश इंगळे उत्रादकर, शंकर बडे, मिर्झा रफी अहमद बेग, बाबाराव मुसळे, अशोक मानकर, नरेंद्र इंगळे आदी साहित्यिकांनी ही समृद्ध बोली आपल्या साहित्यातून भरभरून उधळली आहे. अर्थात ही यादी खूप मोठी होईल. सत्यपाल महाराज, भारत गणेशपुरे, दिलीप देशपांडे यांच्यासारख्या कलावंतांनी आता वऱ्हाडी बोली सर्वदूर लोकप्रिय केली आहे.
वऱ्हाडीचे शब्दभांडार अतिशय समृद्ध आहे. एखादी गोष्ट खूप आवडली तर ही आवड व्यक्त करण्यासाठी काही खास शब्दांची योजना वऱ्हाडीत करतात. जसे - भाजी कशी झाली हे सांगावयाचे असेल तर - ''सनान !'', मुले गोंधळ करीत असली तर ''''दांगळो नोका करू बे !" अशी सूचना. ''मले'' म्हणजे ''मला''. ''माह्या'' म्हणजे ''माझ्या''. माल्या, मपल्या असेही शब्द ''माझ्या'' या अर्थाने वापरतात. अकोल्यात अथी - तथी, अमरावतीत इथं - तिथं, तर बुलडाण्यात अठी - तठी असा काहीसा फरक दिसतो.
''दिले'' ह्या शब्दासाठी ''देलं'' म्हणत असले तरी यवतमाळकडे ''देल्लं'' असा उच्चार करतात. ''तो'' ऐवजी ''थो'' म्हटले जाते. भयताळ, बह्याड, गयभान्या, हेम्बाळ्या, वचकवंगान्या, म्याडवानाच्या, असे अनेक शब्द भान नसलेला, बावळट या अर्थाने वापरतात. आनंद झाला तर ''लय हरीख आला'' असे म्हटले जाते. सायाच्या, बुहाऱ्या, दलिंदरा अशा कित्येक शब्दांचा शिवी म्हणून सर्रास वापर होतो. च्या मायबीन, इचीबिन, हुट च्या मायले असे शब्द वैताग व्यक्त करण्यासाठी कळत नकळत वापरले जातात. ''च्यायला'' हे मुंबईकडे जसे सहज उच्चारले जाते, त्याचीच ही वऱ्हाडी रूपे आहेत.
हिडगा म्हणजे नखरेल, दिखाऊ वृत्तीचा. मुलीसाठी ''हिडगी'' असा शब्द आहे. एखाद्या मुलीला ''काहून हिडगाऊन राह्यली वं ?'' असे म्हटले जाते, तेव्हा ''हिडगावणे'' हे इथे क्रियापद आहे. हिडगावून राह्यली, ठाकून राह्यली, येल्लावून राह्यली, येल पाडून राह्यली, नखरे करून राह्यली, शान मारून राह्यली हे सर्व समानार्थी आहे. ते अलीकडे शायनिंग मारून राह्यली, फ्लॅश मारून राह्यली अशा आधुनिक रूपातही व्यक्त केले जाते.
परंतु हा मूळ बाज वऱ्हाडी आहे. ''हिडग्याले देली गाय अन धावू धावू गोठानावर जाय'' (दिखाऊ वृत्तीच्या व्यक्तीला गाय घेऊन दिली तर तो सतत गोठाणावर जात राहतो.) ''ये ना मये अन घमीलं घेऊन पये'' ( ज्याला काहीही येत नाही, तो आपल्याला खूप काही येतं, असे भासवतो), ''घेनं ना देनं अन कंदील घेऊन येनं'' (एखाद्या गोष्टीचे काहीही सोयरसुतक नसताना उगीच हस्तक्षेप करणे), धसक पाटलाची अन वयानी काचकोराची (स्वतःला प्रतिष्ठित म्हणवताना काचाच्या तुकड्याची ओवाळणी घालणारे उघडे पडतात), घरात नाही दाना अन पाटलीन म्हना (पात्रता नसताना मोठेपणाचा भास निर्माण करणे), तुले ना मले अन घाल कुत्र्याले (दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ), मले पहा अन फुलं वाहा ! (केवळ मला श्रेष्ठ माना), अशा शेकडो म्हणी वऱ्हाडीत प्रचलित आहेत.
मातीत खड्डा करून त्यामध्ये गोवऱ्या जाळून त्यात भाजला जाणारा ''रोडगे'' हा पदार्थ वऱ्हाडात प्रसिद्ध आहे. ''कई बलावता रोडगे खायाले ?'' असे आवर्जून विचारणारा माणूस केवळ वऱ्हाडीच असू शकतो. वऱ्हाडीतील काही शब्द ठळकपणे या बोलीची ओळख म्हणून सांगता येतील. तितंबा (गोंधळ), गमून (करमून), भोंड (भोवळ), मयमय (मळमळ), अल्लादी (हळुवार), टिचरला (तडकला), वांधा (अडचण), पिव्वर (प्युअर), टापोटाप (नीटनेटका), कानकोंडा (खजील), झिलप्या (ठिकऱ्या), फारकत (घटस्फोट), ढोसून (प्राशन करून), हाना (मारा), आपलमत्या (आपोआप), निऱ्हा (केवळ), चेव (जाग), पांचट (बेचव), खिजरू येणे (चिडून येणे), नसानी (चिडचिड करणारी) असे शब्द वऱ्हाडीच्या सौंदर्यात भर घालतात.
त्याचे अर्थ आणि अर्थाच्या छटा हा अर्थातच स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. त्याचे वाक्यात होणारे उपयोग कशी संवादाची रंगत वाढवतात हे आपण पुढील लेखात पाहू. आत्ता ह्या संवादाचा आनंद घ्या -
"नमस्कार. कार्यक्रम सूरसंवाद.''''
''''रामराम संजूभाऊ, वयखलं का मले?''''
''''नाही बुवा.''''
''''भुलले काय बावा, इतक्या लवकर !
कालच च्या पाजला ना म्या तुमाले शिवील लाइन चवकात !''''
''''आपलं नाव सांगा आणि कुठलं गाणं ऐकायचंय, ते सांगा. रेडिओवर दिसत नसल्यामुळे जरा अडचण आहे.''''
''''गजानन यऊतकार बोलून राह्यलो कुंभारीहून.''''
''''बोला गजाननभाऊ, कुठलं गाणं ऐकायचं आहे आपल्याला?''''
''''मेरे डॉगी तू मुझपे भोकनेका नयी... ''''
''''हेच गाणं निवडण्याचं कारण?''''
'''' झेळपीले बायको उभी होती. हिडिओ मोळला आपला. चार-पाच लाखाले बसला झ्याबू !!''''
''''कसं आहे गजाननराव, निवडणूक म्हटलं म्हणजे जय-पराजय आलाच.''''
''''मीबी तेच म्हंतो ना, पन निवळून येनारा लय उतू चाल्ला ना ! त्याच्यासाठी हे गानं...''''
''''काय करता आपण?''''
''''तुमाले फोनच करून राह्यलो आता.''''
''''नाही, म्हणजे व्यवसाय कुठला करता आपण?''''
''''सामाजिक कार्यकर्ता हाव मी. म्हंजे मी करत काहीच नाई तसा,
निवळून आली असती बायको तं मंग काही ना काही केलं असतं. मॅडम नाहीत काय तथी ?''''
''''नमस्कार. मी रश्मी बोलते.''''
''''मले वाटलं तुमी सुट्टीवरच हा काय आज. बोला ना मॅडम काहीतरी.''''
''''अं... आणखी कोण कोण आहे आपल्या कुटुंबात?''''
''''तीन पोरी अन् एक बायको. थांब नं वं ! मुकाट्यानं बसनं... भयताळवानाची तं !!''''
''''काय म्हणालात?''''
''''नाई नाई... तुमाले नाई,
माल्या पोरीले म्हतलं. बोलतो म्हंते तुमच्यासंगं.''''
''''हॅलो काका, मी आलिया बोलून राह्यली.''''
''''बेटा, मी रश्मी बोलतेय.''''
''''बोला काकू.''''
''''कुठल्या इयत्तेत शिकतेस तू ?''''
''''इत्तेत नायी, मी तिसर्या वर्गात हावो.''''
''''तुला पण गाणं ऐकायची आवड आहे का बेटा ?''''
''''नाई, मले कानी चंफुला खेयाची आवळ हाये.''''
''''चंफुला म्हणजे ?''''
''''ते... चिचोके फोळून खेयतात किनी... ते !''''
''''तुला एखादी इंग्रजीची कविता येत असेल.''''
''''माल्या पोप्पासंगं बोला.''''
''''गानं हेच लावजा मात्र... फुल अवाज करून देतो मी !''''
''''ह्या गाण्याऐवजी एक सुंदर गाणं ऐकवित आहोत - ये क्या हुवा... कैसे हुवा...