२०२५ हे नववर्ष तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडविणारे वर्ष ठरणार असल्याची जगभरात चर्चा सुरू आहे. नववर्षात केवळ कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे केवळ एआयच नव्हे, तर एजीआयचे युग सुरू होणार असल्याचे सूतोवाच ओपन एआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी केले होते. एजीआय म्हणजे आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स. एआयचा हा नवा प्रकार आतापर्यंत तंत्रज्ञानालाही जे शक्य झाले नाही, ते करण्याचा प्रयत्न करणार आहे.
विशेष म्हणजे, एजीआय हा मानवी बौद्धिक कौशल्याची बरोबरी करणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. एवढेच नव्हे, तर जगातील आव्हानात्मक परीक्षांना सामोरे जाऊन एजीआय आपली बौद्धिक क्षमता सिद्ध करणार आहे. त्यास काही तंत्रज्ञांकडून ऑटोनॉमस एआय एजंट्स अशी बिरुदावली देण्यात आली आहे.
नववर्षाचे नुकतेच मोठ्या उत्साहात आणि हर्षोल्हासात जोरदार स्वागत झाले. नववर्ष म्हटले की सर्वत्र नवनव्या घडामोडींची, बदलांची, नव्या तंत्रज्ञानाची चर्चा रंगलेली असते. त्यामुळे आपल्या आयुष्यात कोणते बदल होणार, काय नवं अनुभवायला मिळणार आहे, याविषयी अनेकांना उत्सुकता लागलेली असते. तुम्हालाही अशीच उत्सुकता लागलेली असेलच. चला तर मग नववर्षात तंत्रज्ञानामुळे कोणते बदल होणार आहेत? एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे कोणते नवे आविष्कार अनुभवायला मिळणार आहेत, याविषयी या लेखात चर्चा करूया...
आपले दैनंदिन आयुष्य सुकर करण्यासाठी नववर्षात एआयच्या मदतीने अनेक कामे प्रत्यक्षात झाल्यास आश्चर्य वाटायला नको. एआय चॅटबोट्सशिवाय एजीआय आणि ऑटोनॉमस एआयद्वारे वाहतूक व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, वीजवितरण आणि देयक व्यवस्थापन यांसारख्या सार्वजनिक कामांसोबतच व्यक्तिगत पातळीवर तिकीट बुकिंग, ऑनलाइन ऑर्डर वा शॉपिंगसारखे कामही केले जाणार आहे. विशेष म्हणजे, एआयचे हे नवे प्रकार इंटरनेटशिवायही काम करण्यास सक्षम असणार आहे. आतापर्यंत दिव्यांग व्यक्ती कृत्रिम अवयवांच्या मदतीने दररोजची कामे करीत होती. आता एआयच्या मदतीने दिव्यांगांची अनेक कामे सोपी होणार आहेत.
देशातील काही रुग्णालयांमध्ये एआय, जिनोमिक्स आणि डेटा ॲनालिटिक्सच्या मदतीने रुग्णांना उपचार देण्याबाबत प्रयोग सुरू झाले आहेत. नवनर्षात हा प्रयोग अधिकाधिक रुग्णालयांमध्ये उपलब्ध होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. रुग्णाचा आरोग्यविषयक इतिहास, आनुवंशिक संरचना आणि सध्याचा आजार यावरून त्यास कस्टमाइज उपचार दिला जाणार आहे.
हाय प्रीसिजन इमेजिंग आणि बायोमार्कर बेस्ड रक्तचाचण्यांमुळे कोणत्याही आजाराचे कमीत कमी वेळेत अचूक निदान करता येणार आहे. जीन थेरपी, स्टेम सेल उपचारपद्धती, डिजिटल निदान पद्धतीमुळे आरोग्य क्षेत्रात बरीच क्रांती निर्माण झाली आहे. एआय अल्गोरिदमच्या मदतीने कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच निदान करता येईल. त्यामुळे लगेच उपचार सुरू करून रुग्णांना या आजारातून बाहेर काढण्यास मदत होईल.
एआयच्या मदतीने होणाऱ्या नवनव्या प्रयोगांमुळे आतापर्यंत माणूस करीत असलेल्या गोष्टी तंत्रज्ञानाकडून केल्या जाणार आहेत. त्यामुळे डेटाचा अमर्याद वापर वाढणार असल्याचे डेटा सेंटरची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासणार आहे; परंतु हे डेटा सेंटर चालविण्यासाठी ऊर्जेचा वापरही प्रचंड होतो.
पर्यायाने त्यामुळे प्रदूषण तसेच ग्लोबल वॉर्मिंगसारख्या संकटांचा सामना करावा लागतो. त्यावर उपाय म्हणून आगामी काळात डेटा सेंटर थेट अंतराळातच स्थापन केले जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, डेटा सेंटरसाठी लागणारी ऊर्जा अंतराळात सौरऊर्जेच्या माध्यमातून अमर्याद प्रमाणात मिळेल. तसेच, प्रदूषणाचाही प्रश्न उद्भवणार नाही.
शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी नववर्षात नवतंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाणार आहे. सरकारी आकडेवारीनुसार सध्या देशातील १५ ते २९ वयोगटातील केवळ ४.४ टक्के युवावर्गाकडे पारंपरिक व्यावसायिक कौशल्य, तर १६.६ टक्के युवकांकडे अपारंपरिक व्यावसायिक कौशल्य आहेत. नववर्षात हे प्रमाण वाढविण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरणात नवतंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे.
त्यामागील प्रमुख हेतू हा की आगामी काळात जगभरात डिजिटल आणि तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध होणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, ब्लॉकचेन, डेटा सायन्स, सप्लाय चेन मॅनेजमेंट तसेच क्लाऊड कॉम्प्युटिंग यासारखे क्षेत्र युवकांसाठी रोजगाराचे दरवाजे खुले करणार आहे. इंटरनेट ऑफ थिंग्स आणि सायबर सुरक्षा क्षेत्रातही नोकरीच्या संधी निर्माण होणार आहेत.
ज्या पद्धतीने या नवतंत्रज्ञानाचे फायदे आहेत, तसे काही प्रमाणात तोटेही आहे. मेटाव्हर्समध्ये म्हणजे एआय, व्हर्चुअल रिॲलिटी आणि ऑगमेन्टेड रिॲलिटीच्या माध्यमातून तयार केलेल्या आभासी विश्वात काही नतद्रष्ट अवतारांकडून महिला अवतारांचा विनयभंग, बलात्कार करण्याचा प्रयत्न झाला.
याशिवाय एआयच्या मदतीने सायबर गुन्हेगारांकडून अनेक अनैतिक प्रकारही उघडकीस आले. त्यानंतर तंत्रज्ञान क्षेत्रातील या चुकीच्या गोष्टींबाबत चिंताही व्यक्त करण्यात आली. आता नववर्षात तंत्रज्ञान आणि नैतिकता यांचा ताळमेळ बसविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.