लेखणीतून सामान्यांना न्याय देण्याची पत्रकारांची भूमिका – प्रा.डॉ.अशोक उईके
Inshorts Marathi January 07, 2025 05:45 AM

यवतमाळ, दि. ०६ (जिमाका): स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या काळातही पत्रकारांची भूमिका मोलाची राहिली आहे. लेखणीच्या माध्यमातून पत्रकारांनी सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे सेवाव्रत कायम ठेवले. एक मोठा वारसा जिल्ह्याच्या पत्रकारीतेला असून पत्रकाराचा सन्मान आयुष्यभर बाळगू, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी केले.

जेष्ठ नागरीक भवनात श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातमंत्री अशोक उईके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, जेष्ठ पत्रकार अनिरुद्ध पांडे, श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत राऊत, सचिव अमोल ढोणे उपस्थित होते.

प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले. मराठी भाषेतील दर्पन हे पहिले वृत्तपत्र 6 जानेवारी 1832 रोजी सुरु केले. त्यामुळे हा दिवस मराठी पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो. लेखणीच्या माध्यमातून संविधानातील अधिकार व हक्क सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्याची भूमिका पत्रकारांची राहिली आहे. मला आगामी काळात एक चांगले आरोग्य शिबीर घेण्याच्या दृष्टीने आपले सहकार्य राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. सोबतच पत्रकार भवनाच्या संदर्भातही पुढाकार घेउन मदत करु, अशी ग्वाही त्यांनी दिली.

सर्वोत्तम पत्रकार भवन यवतमाळात निर्माण झाले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी आपण पुढाकार घेऊ, अशी हमी त्यांनी दिली. कार्यक्रमाचे अतिथी तथा जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड यांनीही आपल्या भाषणातून जिल्ह्यातील पत्रकारांची भूमिका नेहमी सहकार्याची राहत असल्याचे सांगितले. जेष्ठ पत्रकार अनिरुद्ध पांडे यांनी पत्रकारीतेच्या बदलत्या संदर्भावर भाष्य केले. एखादी बातमी सुटल्याची खंत वाटणे हे पत्रकारीता जिवंत असल्याचे लक्षण होय, असे ते म्हणाले. कुणासोबत कसेही संबंध असले तरी पत्रकाराने सत्य मांडले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

प्रास्ताविक श्रीकांत राऊत यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन केशव सवळकर यांनी केले. आभार सुरेंद्र राऊत यांनी मानले. या कार्यक्रमाला पत्रकार दिनेश गंधे, गणेश बयास, नितीन पखाले, राजकुमार भितकर, नितीन भागवते, अविनाश साबापुरे, विवेक गावंडे, विवेक कवठेकर, नागेश गोरख, गणेश राऊत, मेहमुद नाथानी, रुघुवीरसिंह चव्हाण, विरेंद्र चौबे, चेतन देशमुख, रुपेश उत्तरवार, प्रविण देशमुख, अमोल शिंदे, किशोर जुनुनकर, प्रा. विवेक विश्वरुपे, दिपक शास्त्री, संजय सावरकर, श्याम वाढई, तुषार देशमुख, मनिष जामदळ, अतुल राऊत, सुधीर मानकर, लक्ष्मणलाल खत्री, विवेक वानखेडे, जयंत राठोड, संजय राठोड, नितीन भुसरेड्डी, राहूल वासनिक, विजय बुंदेला, अनिकेत कावळे, मकसूद अली, सय्यद मतीन सय्यद मुनाफ, रवीश वाघ, गौतम गायकवाड, नितीन राऊत, श्याम आरगुलवार आदी उपस्थित होते.

०००

The post first appeared on .

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.