केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवा – राज्यमंत्री मेघना बोर्डीकर
Inshorts Marathi January 07, 2025 05:45 AM

परभणी, दि. ०६ (जिमाका) : नागरिकांना लोककल्याणकारी योजनांचा तत्परतेने लाभ मिळावा यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजना परभणी जिल्ह्यात प्रभावीपणे राबवाव्यात, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत श्रीमती बोर्डीकर यांनी आज विविध विभागांचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीस जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, महानगर पालिका आयुक्त धैर्यशील जाधव, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे आदींसह आरोग्य, सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज वितरण कंपनी, महिला व बालकल्याण, महाऊर्जा, ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी आरोग्य, महिला व बालकल्याण, वीज वितरण, महाऊर्जा, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचा आढावा घेतला. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अद्यावत करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केला जाईल, असे सांगून त्या म्हणाल्या की, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रुग्णसेवा जबाबदारीने करावी. रुग्णांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ देऊ नये. वेळेवर उपचार देण्याबरोबरच नागरिकांना आरोग्य विषयक योजनांचा प्राधान्याने लाभ द्यावा. सर्व रुग्णालये, आरोग्य केंद्र स्वच्छ ठेवावीत. त्या ठिकाणी पाणी व शौचालयाची पुरेशी व्यवस्था करावी. दिव्यांग रुग्णांना वेळेत उपचार द्यावेत. जिल्ह्यात एकही बालक कुपोषित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. बालविवाह होणार नाहीत, याबाबत खबरदारी घ्यावी. एचएमपीव्ही विषाणू बाबत बोलताना त्या म्हणाल्या की, सध्या चिंतेचे कारण नसले तरी आरोग्य यंत्रणेने दक्ष रहावे. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, मात्र पुरेशी काळजी घ्यावी.राज्यमंत्री श्रीमती बोडींकर म्हणाल्या की, वीज वितरण विषयक तक्रारींचे तात्काळ निराकरण करावे. शेतकऱ्यांना अखंडित वीज द्यावी. प्रधानमंत्री सूर्य घर योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. प्रलंबित पाणी पुरवठ्याच्या योजना तातडीने मार्गी लावाव्यात. विशेषत: ग्रामीण भाग, तांडा वस्तींवर पाणी पुरवठा प्राधान्याने करावा. शाळा, अंगणवाडी यांना नळ कनेक्शनद्वारे पाणी द्यावे.

प्रारंभी संबंधित विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी प्रशासन दक्ष असून विविध योजनांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल, असे सांगितले.

बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्ह्यातील केकर जवळा ता. मानवत, उखळी ता. सोनपेठ, पेठशिवणी ता. पालम, असोला ता. परभणी, भोगाव ता. जिंतूर, लोहगाव ता. परभणी येथे नव्याने सुरु करण्यात येत असलेले प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकांचे राज्यमंत्री श्रीमती बोडींकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन करण्यात आले. तसेच टीबी मुक्त भारत अभियान या जनजागृतीपर वाहनालाही हिरवी झेंडी दाखविण्यात आली.

०००

The post first appeared on .

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.