बीड : मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या आणि पवनचक्की खंडणी प्रकरण लावून धरणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी वाल्मीक कराडसाठी ‘आका’ तर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यासाठी ‘आकाचे आका’ अशी विशेषणे वापरून राळ उठविली. आता त्यांनी ‘बडी मुन्नी’ हे नवे विशेषण आणले. ‘मुन्नी’ ही राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील पुरुष असल्याचे धस यांनी स्पष्ट केले.
धस यांच्यावर प्रतिहल्ल्याची रणनीती राष्ट्रवादी कॉँग्रेसने आखली आणि पक्षाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी, युवक आघाडीचे सूरज चव्हाण यांना मैदानात उतरविले. मिटकरी व चव्हाण यांच्या आरोपांबद्दल धस यांना विचारले. त्यावेळी अमोल मिटकरी आणि सूरज चव्हाण ही बालवाडीतील पोरं आहेत.
त्यांना कशाला माझ्यावर बोलायला सांगता?, ‘राष्ट्रवादी’तील बडी आणि ‘बदनाम मुन्नी’ने समोर येऊन बोलावे, मग मी बघतो, असे म्हणत मिटकरी, चव्हाण यांचा बोलविता धनी कुणीतरी वेगळाच आहे, असे उत्तर धस यांनी दिले.
‘मुन्नी’ कोण या प्रश्नावर आज त्यांनी माध्यमांना उत्तर दिले. ते म्हणाले, की ‘मुन्नी’कोण ते संबंधिताला कळले आहे. ती महिला भगिनी नसून, ती ‘राष्ट्रवादी’तील पुरुष आहे. धस माझ्याबद्दल बोलतोय, हे त्या पुरुष ‘मुन्नी’ला पक्के माहीत आहे. ‘मुन्नी’ पुढे आल्याशिवाय मजा येणार नाही. ‘मुन्नी’ मला शंभर टक्के घाबरते. ‘राष्ट्रवादी’तून आम्हाला बाहेर काढायला ‘मुन्नी’चा मोठा हात होता, असे धस यांनी सांगितले.