प्रणव रावराणे आणि दीप्ती लेले
चित्रपटसृष्टीत सहकलाकारांमधील नाती अनेकदा त्यांच्या कामातून उभी राहतात आणि हीच नाती पुढे जाऊन मैत्रीचे रूप घेतात. अभिनेता प्रणव रावराणे आणि अभिनेत्री दीप्ती लेले यांची मैत्रीदेखील याच प्रकारची आहे. ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांची ओळख झाली आणि स्वभावातील साम्यांमुळे ही ओळख घट्ट मैत्रीत बदलली. विशेष म्हणजे त्यांच्या मैत्रीचा गाभा ठरला ‘घर’ हा विषय.
प्रणवने मैत्रीबद्दल सांगताना दीप्तीबद्दल कौतुक व्यक्त केले. तो म्हणतो, ‘‘दीप्तीने इंडस्ट्रीत कोणत्याही प्रकारच्या वशिल्याशिवाय फक्त तिच्या टॅलेंटवर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ती अतिशय मेहनती आहे आणि तिच्या संघर्षाचा मला खूप आदर वाटतो.’’
प्रणवने एक मजेदार किस्सा सांगितला, ‘‘चित्रपटाच्या पहिल्या वाचनादरम्यान ती मुंबईत घर घेण्याच्या विचारात होती. मी नुकतेच नवीन घर घेतल्यामुळे यासंदर्भात आमच्यात चर्चा झाली. तिच्या घरखरेदीच्या योजनेवर माझ्याकडील माहिती मी तिला सांगितली. या गप्पांमधून आमच्यात नवे विषय आले, आणि त्यातूनच आमची मैत्री रुजली.’’
दीप्तीने प्रणवच्या स्वभावाचे विशेष कौतुक केले. ती म्हणते, ‘‘प्रणवचा साधेपणा आणि मनमोकळा स्वभाव त्याला सगळ्यांशी जोडतो. कामातली त्याची प्रामाणिक मेहनत आणि सर्वांशी प्रेमाने वागण्याचा स्वभाव हे शिकण्यासारखे आहे.’’
ती पुढे सांगते, ‘‘पहिल्याच वाचनावेळी तो परेश सरांना सतत प्रश्न विचारत होता. त्याच्या प्रश्न विचारण्याच्या सवयीमुळे मला खूप हसू आले; पण त्याच वेळी मला जाणवले, की तो काम समजून घेण्यासाठी खूप प्रयत्नशील आहे.’’
दीप्तीला प्रणवसोबतची पहिली भेटसुद्धा खास वाटते. ती म्हणते, ‘‘प्रणव खूप बोलका आणि सहजसुंदर स्वभावाचा आहे. त्यामुळे पहिल्यांदाच भेटूनही आम्हाला असे वाटले नाही, की आमची ओळख नवी आहे. आम्ही जणू वर्षानुवर्षे ओळखतो असे वाटले.’’
प्रणव आणि दीप्तीच्या मैत्रीचे विशेष म्हणजे त्यांच्यातील समान दुवा - कामाप्रती निष्ठा आणि स्वकष्टाने ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न. ‘घर’ ही संकल्पना त्यांच्यासाठी मैत्रीची सुरुवात ठरली. दोघेही आपल्या संघर्षाच्या वाटेवर चालत एकमेकांना प्रेरणा देत राहिले.
प्रणवच्या मते, मैत्री म्हणजे निष्ठा, समर्पण आणि एकमेकांसाठी कायमचा आधार. ‘‘माझ्यासाठी मैत्री म्हणजे दुनियादारी. मित्रांसाठी काहीही करण्याची तयारी माझी नेहमीच असते आणि दीप्ती म्हणजे ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’मुळे मिळालेली एक खास मैत्रीण आहे,’’ असे तो सांगतो.
चित्रपटसृष्टीत मैत्री म्हणजे एकमेकांच्या भावनांचा आणि संघर्षांचा आदर करणारे नाते. प्रणव रावराणे आणि दीप्ती लेले यांच्या मैत्रीचे हे उदाहरण या नात्याचा सुंदर नमुना ठरते. त्यांच्या मैत्रीमुळेच ‘मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी’ची आठवण कायमच खास राहील.
(शब्दांकन : मयूरी गावडे)