मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार – संजय राऊतांची मोठी घोषणा
GH News January 11, 2025 02:09 PM

शिवसेना ठाकरे गट आता सर्व महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा संजय राऊत यांनी केली आहे. मुंबईपासून ते नागपूरपर्यंत प्रत्येक महानगरपालिका ही स्वबळावर लढणार आणि कार्यकर्त्यांना बळ देणार असं संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना नमूद केलं. “मुंबईसह नागपूर महापालिका आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, एकदा आम्हाला आजमावयचंच आहे”, असे संजय राऊत म्हणाले. उद्धव ठाकरेंनी आम्हाला स्वबळावर लढण्याचे संकेत दिल्याचे सांगत राऊत यांनी हा निर्णय जाहीर केला. सध्या राज्यातील सर्वच पक्षांकडून महापालिकेच्या निवडणुकांची तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यातच आता ठाकरे गटाकडून आगामी महापालिकांच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा करण्यात आली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाची महत्वाची बैठक उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी घेतली होती. या बैठकीत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. तसेच काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे संकेत दिले होते. अखेर आज ठाकरे गटात्या वतीने संजय राऊतांनी ही घोषणा केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.