बीड : पुण्यात गेल्या काही वर्षांपासून कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. कोयता गँगमुळे नागरिक दहशतीत आहेत. कोयता गँगमुळे लोकांमध्ये एक भीती पसरली आहे. कोयता गँगच्या वाढत्या गुन्ह्यामुळे पोलिसांसमोरील आव्हान वाढलं आहे. याचदरम्यान, पोलिसांनी कोयता गँगवर मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी गँगच्या मुख्य आरोपीला अटक केली आहे. या कारवाईनंतर कोयता गँगचं बीड कनेक्शन समोर आलं आहे.
पुण्यातील कोयता गँगच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. या पोलिसांच्या कारवाईत कोयता गँगचे बीड कनेक्शन समोर आलं आहे. या गॅंगचा मुख्य आरोपी गोरख सातपुते याला त्याच्या साथीदारासह बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे. बीडच्या गेवराई शहरातील म्हाडा कॉलनी भागात असलेल्या एका रिक्षामध्ये, दोघा जणांकडे तलवार आणि कोयता असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला त्या ठिकाणी सापळा लावत कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
पोलिसांचं हे पथक त्या ठिकाणी दाखल झालं होतं. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना पकडले असता यामध्ये गोरख सातपुते, तात्याराव उर्फ वैभव विजय पहाडे हे दोघे आढळून आले. त्यांच्या ताब्यातून कोयता, तलवार, चाकू आणि रिक्षा असा मुद्देमाल आढळून आला आहे. तर या दोघांवरही गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी पुढील तपासासाठी या दोघांनाही ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी कोयता गँगने पुण्यात विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुकाने आणि वाहने फोडली होती. काही नागरिकांवर हल्ला चढवण्यात आला आहे. यातील एक गुन्हेगाराला लोकांनी पकडून चोप दिला होता. त्यानंतर या गुन्हेगाराला पोलिसांचं स्वाधीन केलं होतं. पुण्यातील वाढत्या कोयत्या गँगच्या गुन्हेगारी कृत्यामुळे पुणेकर चिंता व्यक्त करत आहेत.