सुपा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विकासकामांची पाहणी
Inshorts Marathi January 12, 2025 04:45 AM

पुणे, दि. ११: सुपा येथील उपजिल्हा रुग्णालयासह तालुक्यात विविध विकासकामे सुरु असून ही विकासकामे करताना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे, असे निर्देश सार्वजनिक विकासकामांच्या पाहणीप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

श्री. पवार यांनी शहरातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे शासकीय विश्रामगृह व परिसर सुशोभीकरण, सुपे परिसरातील उप जिल्हा रुग्णालय, पोलीस ठाणे इमारत, बाजार समितीकडील रस्ता व संरक्षण भिंत, काऱ्हाटी येथील कऱ्हा नदीवरील पुलाची रेखा (अलाईनमेंट) निश्चित करणे आदी विकासकामांची पाहणी करुन संबंधित अधिकांऱ्याकडून माहिती घेतली.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर, महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, कार्यकारी अभियंता अमोल पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, गट विकास अधिकारी अनिल बागल, मुख्याधिकारी महेश रोकडे, कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक मुंडे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे शासकीय विश्रामगृहाचे नूतनीकरण व परिसर सुशोभीकरणाची कामे करताना परिसरातील जागेचे सपाटीकरण करुन घ्यावे. नूतनीकरण करण्यात येणाऱ्या इमारतीमध्ये पाणी गळती होणार नाही, कक्षामध्ये खेळती हवा, स्वच्छ सूर्यप्रकाश राहील, कामे पूर्ण झाल्यावर कमीतकमी देखभाल दुरुस्ती होईल, यादृष्टीने कामे करावीत. परिसरात अधिकाधिक वृक्षांची लागवड करावी. विश्रामगृहात येणाऱ्यांकरिता बैठक व्यवस्था, संरक्षक भिंत, वाहनांकरिता दर्जेदार वाहनतळ तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवासस्थान आदीबाबत आराखडा तयार करण्यात यावा.

परिसरातील जळोची मार्गावरील पदपथावर नागरिकांना अडथळा निर्माण करणाऱ्या वृक्षाच्या फांद्याची छाटणी करावी. नक्षत्र बगीच्याची संरक्षण भिंत पुरेशा उंचीची करावी. स्व.नानासाहेब सातव चौकातून विनाअडथळा वाहने बाहेर निघाली पाहिजेत, यादृष्टीने चौकाची कामे करावीत.

सुपा कृषी उत्पन्न बाजार समितीची संरक्षक भिंत, रस्ते, मुख्य दरवाज्याचे बांधकाम सुरु करावे. सुपा पोलीस ठाण्याच्या मुख्य दरवाजाचे कामे करताना मुख्य इमारतीचा उंचीचा विचार करण्यात यावा. सुपे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याबाबत निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून प्रशासन आणि नागरिकांनी जागा निश्चित करावी, असे श्री. पवार म्हणाले.

The post first appeared on .

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.