मुंबई : लोकसभा, विधानसभा निवडणुकांनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Election) निवडणुकांचे वेध कार्यकर्ते व राजकीय पक्षाच्या प्रमुखांना लागले आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे, महाविकास आघाडी राहणार की नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. त्यातच, सर्वच राजकीय पक्षांनी स्थानिक स्वराज्य पक्षांच्या निवडणुकांची तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme court) सुनावणीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. 22 जानेवारी रोजी ही सुनावणी होत असून अंतिम सुनावणी व्हावी, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच म्हटलं होतं.
महाराष्ट्रातील जवळपास 29 महागनरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद आणि 289 पंचायत समित्यांवर सध्या प्रशासक काम करत असून गेल्या 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून प्रशासक नेमण्यात आल्याने स्थानिक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची बिगुल वाजणआर आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना राज्य पातळीवर वेग आला असून लवकरच राज्य निवडणूक आयुक्त यांच्या नावाची शिफारस होणार आहे, विशेष म्हणजे आजच ही शिफारस गेली जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे, आता विधानसभा निवडणुकांच्या विजयी जल्लोषानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांचा विजयी गुलाल उधाळण्याची तयारी राजकीय पक्षांकडून सुरू होईल. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महायुतीला दैदिप्यमान यश मिळाल्याने महायुतीच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.
मंत्रिपरिषदेच्या बैठकीत चर्चा करुन राज्य निवडणूक आयुक्तांच्या नावांची शिफारस केली जाणार आहे. गेली अनेक दिवसांपासून हे पद रिक्त आहे. त्यामुळे, निवणुकांपूर्वी ह्या पदावर नियुक्ती करणे महत्त्वाचे आहे. सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र, याच महिन्यात याप्रकरणी सुनावणी होणार आहे. त्यातच, ही सुनावणी अंतिम व्हावी, यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापू्र्वीच सांगितलं होतं. त्यामुळे, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आता वेग आल्याचे दिसून आले. साधारणत: एप्रिल महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासाठीच राज्य निवडणूक आयुक्तांच्या नावाची आज शिफारस केली जाणार आहे.
अधिक पाहा..