बीड – संतोष देशमुख हत्याकांडातील मास्टरमाईंड म्हटला जाणारा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्या समर्थनार्थ आता त्याची पत्नी मंजली कराड मैदानात उतरल्या आहेत. वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई सुरु झाल्यानंतर कराड समर्थक आणि त्याचे कुटुंबिय रस्त्यावर उतरले. आज कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी कोर्टाबाहेर कराड समर्थक आणि संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी लढणारे समोरासमोर आले. बीडमध्ये जातीयवादी राजकारण केले जात असल्याचा आरोप मंजली कराड यांनी केला. मृत संतोष देशमुख यांच्या कुटुबियांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. तर वाल्मिक कराडची पत्नी मंजली कराड यांनीही मनोज जरांगे पाटील यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे. माझ्या नवऱ्याला कट रचून अडकवले आहे. मी देखील मराठा आहे. मला न्याय कसा देणार ते सांगा, असा सवाल मंजली कराड यांनी मनोज जरांगे यांना केला आहे.
मनोज जरांगे यांच्याकडे संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी न्याय मागितला. संतोष देशमुखांसोबत कुकर्म झालं. त्यांना न्याय द्यायला मनोज जरांगे पाटील तिथे जातात. पण मी देखील याच समाजाची घटक आहे, मला न्याय कोण देणार? असा सवाल करत मंजली कराड यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे मोठी मागणी केली. त्या म्हणाल्या की, माझ्या नवऱ्यावर अन्याय झाला. कट-कारस्थान केले जात आहे. त्यांना डांबून टाकले आहे. मी न्याय कोणाकडे मागायचा. मी आज जरांगे पाटलांनाच न्याय मागते. मी देखील मराठा समाजाचीच व्यक्ती आहे. मी मराठा म्हणून महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांना आणि माझ्या दुसऱ्या वंजारी बांधवांना विनंती करते की मला सुद्धा न्याय पाहिजे. आज माय बहिणींवर अन्याय होत असेल, तिच्या कुटुंबावर अन्याय होत असेल तर तिला पूर्ण अधिकार आहे न्याय मागण्याचा. तो न्याय मी मागत आहे. तुम्ही मला न्याय कसा देणार, हे तुम्हीच मला सांगा. जातीयवाद केला जात आहे. संतोष देशमुख हे एकटेच मराठा समाजाचे आहेत का? मला सुद्धा न्याय मागण्याचा अधिकार आहे, तो न्याय तुम्ही कसा देणार ते सांगा, असा सवाल त्यांनी मनोज जरांगे यांना केला.
मीडिया ट्रायल करुन स्टेप बाय स्टेप माझ्या नवऱ्याच्या एक-एक गोष्टी बाहेर आणल्या, मी देखील स्टेप बाय स्टेप तुमच्या एक-एक गोष्टी बाहेर आणणार, असा इशारा त्यांनी आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, खासदार बजरंग सोनवणे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना दिला. त्यांच्यासुद्धा अनेक गोष्टी असतील, त्या मी शोधत आहे. त्या गोष्टी मी माध्यमांसमोर आणणार असे आव्हान मंजली कराड यांनी दिले.
मंजली कराड म्हणाल्या की, आज सकाळी बजरंग सोनवणे म्हणाले की परळीला दोन-दोन मंत्रीपदं कशी? ही त्यांची पोटदुखी आहे. या पोटदुखीमुळेच त्यांनी माझ्या नवऱ्याला बळीचा बकरा करुन पूर्ण डांबून टाकले आहे.
हेही वाचा : Walmik Karad : धनंजय मुंडेंनी घेतली कराडच्या आई, पत्नीची भेट? मंजली कराडांनी केला खुलासा
बीड न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सीआयडीला प्रश्न केल्याचे मंजली कराड यांनी सांगितले. एका फोन कॉलवर तुम्ही 302 आणि मकोका कसा काय लावला, असा सवाल तपास यंत्रणांना करण्यात आला. मात्र न्यायव्यवस्थाही कोणाच्यातरी हातात आहे, आणि कोणालातरी बळी पडली आहे, हे आज दिसले. कोणाच्या तरी स्ंटटमुळे माझ्या नवऱ्याला अडकवले आहे. पण आम्ही न्यायव्यवस्थेनेच चालणार आहोत. कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी सत्य काही लपून राहणार नाही, ते समोर येणारच आहे. तुम्ही कट कारस्थानं करुन माझ्या नवऱ्याला अडकवलं आहे. ठीक आहे तुम्ही अडकवा. पण न्यायव्यवस्था मला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि माझा माणूस बाहेर आल्याशिवाय राहणार नाही, असा दावा मंजली कराड यांनी केला.
वाल्मिक कराड याच्या नावावर पिंपरी चिंचवडमध्ये असलेला फ्लॅट सील केला जाणार असल्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यावरही मंजली कराड यांनी संताप व्यक्त केला. पुण्यात आमचा फ्लॅट असल्याचे मान्य करत त्या म्हणाल्या की, मी त्या फ्लॅटवर राहात नाही. तिथे कोणीच राहात नाही. पालिकेची नोटीस आम्हाला मिळाली नाही. त्यांनी ती नोटीस काही आम्हाला परळीला पाठवली नाही. त्यांनी नोटीस दारावर चिकटवली होती. कर भरला नाही म्हणून फ्लॅट सील करणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. दारावर नोटीस चिकटवली आहे, हे अधिकाऱ्यांनी आज माध्यमांना सांगितल्यावरच आम्हाला कळाले, असाही दावा मंजली कराड यांनी केला.
फ्लॅट घेणे यात गैरप्रकार काय आहे, असा सवाल करत त्या म्हणाल्या की, फ्लॅट कोणाकडे नाही? आमच्याकडेच फक्त फ्लॅट आहे का? बाकीचे सगळे झोपडपट्टीत राहातात का? प्रत्येकाकडे फ्लॅट आहे, प्रत्येकाकडे सगळ्या वस्तू आहे. आम्ही लोन घेऊन फ्लॅट घेतला आहे. त्याची सर्व कागदपत्र आहेत, असंही मंजली कराड म्हणाल्या.
हेही वाचा : Walmik Karad : संतोष देशमुखांच्या हत्येचं कारण आलं समोर; बीड न्यायालयातील सुनावणीत SITचा मोठा दावा