960 कोटींची ऑर्डर मिळताच शेअर बनला रॉकेट, सचिन तेंडुलकरनं देखील केलीय गुंतवणूक
Marathi January 16, 2025 05:25 PM

मुंबई : स्मॉलकॅप कंपनी आझाद  इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरमध्ये 9 टक्क्यांपेक्षा अधिक तेजी पाहायला मिळाली. या कंपनीचे शेअर 1732.55 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. आझाद इंजिनिअरिंगला अमेरिकेयाच्या जीई वर्नोवा इंटरनॅशनलकडून 960 कोटींची ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर 6 वर्षांसाठी असेल.

स्मॉलकॅप कंपनी आझाद इंजिनिअरिंगच्या शेअरमध्ये आज तेजी दिसून आली. गुरुवारी म्हणजेच आजचं शेअर 1732.55 रुपयांवर पोहोचले आहेत. अमेरिकेच्या कंपनीकडून सप्लाय डीलची ऑर्डर मिळाल्यानंतर शेअरमध्ये तेजी निर्माण झाली आहे.

आझाद इंजिनिअरिंग कंपनीला अमेरिकेच्या जीई वर्नोवा इंटरनॅशनलकडून 960 कोटींची सप्लाय डील मिळाली आहे. या डीलनुसार अँडवान्सड गॅस टर्बाइन इंजिन्ससाठी कॉम्प्लेक्स रोटेटिंग आणि स्टेशनेरी एअरफॉल्सचा पुरवठा करेल. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं देखील या कंपनीत गुंतवणूक केलेली आहे.

आझाद इंजिनिअरिंगला अमेरिकेतील कंपनीकडून दीर्घकाळासाठी काँट्रॅक्ट मिळालं आहे. या कराराचा कालावधी सहा वर्षांचा असेल. हे जवळपास 960  कोटी रुपयांची डील आहे. कंपनीनं यापूर्वी जपानच्या मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीज लिमिटेडसोबत करार केला होता.तो करार साधारणपणे 700 कोटी रुपयांचा होता. याशिवाय आझाद इंडस्ट्रीजनं फ्रान्सच्या कंपनीसोबत 340 कोटींची भागिदारी केली आहे.

एका वर्षात 150 टक्क्यांनी शेअर वाढले?

आझाद इंजिनिअरिंगच्या शेअरमध्ये गेल्या वर्षभरात 150 टक्क्यांची वाढ झाली आहे. 16 जानेवारी 2024 ला कंपनीचा शेअर 670.70 रुपयांवर होता. सध्या तो 1732.55 रुपयांवर पोहोचला आहे. आझादचा शेअर 52 आठवड्यांमध्ये  2080 रुपयांपर्यंत पोहोचला होता. आझादचा आयपीओ 20 डिसेंबर 2023 ला खुला झाला होता. कंपनीनं आयपीओचा किंमतपट्टा 524 रुपये निश्चित केला होता.

आझाद इंजिनिअरिंगमध्ये सचिन तेंडुलकरनं देखील गुंतवणूक केली आहे. सचिन तेंडुलकरनं 6 मार्च 2023 ला 5 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअरनुसार सचिनला एक शेअर 114.10 रुपयांना मिळाला होता. सचिनकडे कंपनीचे 4 लाख 38 हजार 210 शेअर मिळाले होते. 28 डिसेंबर 2023 ला आझाद इंजिनिअरींच्या लिस्टींगवेळी सचिनच्या गुंतवणुकीची मूल्य 31.55 कोटी रुपये झालं होतं. जून 2024 ला सचिन तेंडुलकरच्या गुंतवणुकीची रक्कम 72 कोटी झाली होती. सचिनकडे कंपनीचे सध्या किती शेअर आहेत, हे समोर आलं नाही.

इतर बातम्या :

Adani Stocks : हिंडेनबर्ग रिसर्च बंद झालं, अदानींच्या शेअर मध्ये जोरदार तेजी, शेअर बाजारात काय घडतंय?

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.