मला जगभरातील आदिम संस्कृतीचं खूप अप्रूप आहे. आज निसर्गाचा ऱ्हास, पर्यावरणीय असंतुलन, जागतिक तापमान वाढ असे मुद्दे जगात जीवन-मरणाचा विषय झालेले असताना निसर्ग रक्षणाची गुरुकिल्ली असलेल्या आदिम संस्कृतीच्या अभ्यासाची गरज प्रकर्षानं जाणवते.
तुम्ही जगाचा नकाशा पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की जिथं जंगल आहे, हिरवाई आहे तिथंच आदिवासी आहेत किंवा असंही म्हणता येईल, की जिथं आदिवासी आहेत तिथंच समृद्ध निसर्ग, हिरवाई आहे. मात्र आपल्या देशात आदिवासींच्या आदिम संस्कृतीला सतत हिणवण्याची आणि त्यांच्यात न्यूनगंड निर्माण करण्याची एक चुकीची प्रथा चालत आलेली बघायला मिळते.
थेट सिंधू संस्कृतीशी नातं असलेल्या या मूलनिवासींकडे पूर्वीपासूनच एकतर रानटी म्हणून वाईट दृष्टीनं बघितलं गेलं किंवा ते मागास आहेत असं सरसकट ठरवून त्यांच्याप्रति केवळ दयाबुद्धीच्या भावनेनं बघितलं गेलं. त्यामुळे ज्यांना आपण रानटी, वनवासी म्हणतो, त्याच आदिवासींचं गोंड साम्राज्य आंध्र प्रदेशच्या शिरपूर ते महाराष्ट्रातील चांदा ते देवगड मध्य प्रदेशपर्यंत थोडंथोडकं नाही तर ५०० ते ७०० वर्षे होतं हे आपण सोईस्कररीत्या विसरतो.
आज राज्याचे मुख्यमंत्री ज्या नागपूर शहरातील आहेत, ते शहरच मुळात गोंडराजा बख्त बुलंद शहा यांनी वसवलं आहे, याचा साधा उल्लेखही आपण करत नाही. ज्यांनी साम्राज्य निर्माण केली, त्यांचं संचालन केलं, राजवैभव उपभोगलं त्यांना आपण मागास, पिछडे वगैरे म्हणून मुख्य प्रवाहातून बाद ठरवतो.
माझं बालपण सोनझारी आदिवासींच्या संगतीत गेलं, पुढं रानोमाळ भटकताना मला आदिम जीवनाचा जवळून परिचय झाला. पण मला या संस्कृतीचं खरं दर्शन गडचिरोली जिल्ह्यात आल्यावर आणि त्यातही मला मिळालेल्या केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या फेलोशिपमुळे झालं.
या फेलोशिपसाठी ''गोंड, माडिया आदिवासींच्या लोकगीतांच्या माध्यमातून त्यांच्या जीवन आणि संस्कृतीचा अभ्यास'' असा विषय मी निवडला होता. यानिमित्तानं मी दोन वर्ष गोंड, माडिया आदिवासींची लोकगीतं, त्यांचं जीवन, एकूण आदिवासी संस्कृतीचं स्वरूप याच संशोधनात रमलो होतो. या संशोधनादरम्यान अनेक पुस्तकं वाचता आली. शिवाय गडचिरोली जिल्ह्यात अनेक वर्षांपासून फिरत असल्यानं मला या संस्कृतीची रहस्य उलगडू लागली.
मागच्या लेखात आदिवासी गावं कशी स्वच्छ, सुटसुटीत घरांची आणि एकमेकांत बरचसं अंतर राखलेली असतात, हे मी सांगितलं होतं. कोरोनाच्या महासाथीमुळे आपल्या आदिवासी पूर्वजांची ही अत्यल्प घरांच्या गावांची संकल्पना किती उपयोगी होती हे कळतं. आदिवासी घरांची आणखी एक गंमत असते. ही घरं एकावर एक म्हणजे पहिला माळा, त्यावर दुसरा माळा अशी बांधली जात नाहीत. ती समांतर बांधली जातात. म्हणजे समजा एक छोटं घर आहे.
त्यात पुढं पडवी, मग त्यालाच जोडून एकामागे एक दोन खोल्या असतील, तर त्या कुटुंबातील मुलगा त्यालाच जोडून बाजूला तशीच पडवी आणि दोन खोल्या बांधतो. समजा एकाच कुटुंबात पाच भाऊ असतील, तर प्रत्येकाची अशी एकाला लागून एक खोली वाढत ते घर आडवं वाढत जातं. पडवी मात्र सारखीच असते. आज आपण जे फार्म हाउस बघतो ती मूळ संकल्पना आपल्या आदिम पूर्वजांचीच बरं का !
आदिवासींची शेतात जी घरं असतात त्यांना खेतुली म्हणतात. आदिवासींच्या अंगणातल्या मांडवाखाली मुंडा (एक प्रकारचे चौकोनी आणि शिल्पांकित लाकूड) रोवलेला असेल तर तिथं लग्न झालेलं आहे समजायचं. अंगणात रोवलेल्या या मुंड्याला पुन्हा पालवी फुटली, तर त्या जोडप्याचा संसार बहरतो, असही मानतात. आदिवासींच्या घरावर ७५० हा आकडा लिहिलेला असतो.
या आकड्याचा नेमका अर्थ अनेकदा आदिवासींनाही सांगता येत नाही. मी संशोधन करत असताना मला एक पाटा (गोंडी भाषेत गाण्याला पाटा म्हणतात.) मिळाला. कुपार पेन कालाल पाटा हे आदिवासी गीत म्हणजे दोन व्यक्तींचा संवाद आहे. बुद्ध काळापासून प्रश्नोत्तरातून ज्ञान देण्याची परंपरा आपल्याकडे आहे. तथागत बुद्ध अनेकदा पुढच्या व्यक्तीच्या प्रश्नांची उत्तरं देत ज्ञानवर्धन करत.
हिंदू पुराणांमध्ये यम-नचिकेत संवाद किंवा महाभारतातील यक्षप्रश्न हे प्रकारसुद्धा याच पद्धतीचे आहेत. ग्रीक तत्त्ववेत्ता सॉक्रेटिस आपल्या शिष्यांना प्रश्न विचारून किंवा त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देऊन ज्ञान द्यायचा. अगदी आपले वैराग्यमूर्ती गाडगेबाबांनीसुद्धा हीच पद्धत वापरली होती. तर मला मिळालेल्या आदिवासी गीतात एक व्यक्ती होती आदिवासींचे धर्मगुरू पहांदी पारी कुपार लिंगो आणि त्यांना प्रश्न विचारणारी दुसरी व्यक्ती होती काला.
तर हा काला विश्वाच्या, ब्रह्मांडाच्या अनेक रहस्यांबाबत पहांदी पारी कुपार लिंगो यांना प्रश्न विचारतो आणि ते उत्तर देतात. त्यामुळे या गाण्यात प्रत्येक वेळी कालाच्या तोंडी ''इमा वेहाय लिंगो, इमा वेहा, वेहा, वेहा'' ही ओळ येते तर कुपार लिंगो यांच्या तोंडी ''इमा केंजा रो काला, इमा केंजा, केंजा, केंजा'' ही ओळ येते. गोंडी भाषेत वेहा म्हणजे सांग आणि केंजा म्हणजे ऐक असा अर्थ आहे. यात काला एक प्रश्न विचारतो, की ग्रहमालेत एकूण ग्रह किती आहेत.
पहांदी पारी कुपार लिंगो म्हणतात, १२ ग्रह आहेत. मग काला विचारतो, आकाशगंगा किती आहेत. ते म्हणतात, आकाशगंगा अनंत आहेत. त्यानंतर काला एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारतो, की मनुष्य किती आकाशगंगांचा अभ्यास करू शकेल. लिंगो म्हणतात, की मनुष्य ७५० आकाशगंगांचा अभ्यास करू शकेल.
या गीतातच आदिवासींच्या आदिम व्यवस्थेचं रहस्य दडलं आहे. पहांदी पारी कुपार लिंगो यांनी आदिवासींची संपूर्ण व्यवस्था तयार करताना त्यांची १२ ग्रहांनुसार १२ गटांत विभागणी केली. या प्रत्येक गटाला त्यांच्या संख्येनुसार देव वाटून दिले.
खरेतर कलिकंकालीच्या पोटी जन्माला आलेल्या या देवांचीही कथा रंजक आहे. पण विस्तारभयास्तव लिहीत नाही. या गटांनाच गोंडी भाषेत सगा किंवा सगावेन म्हणतात. यात नालवेन (चार देवे), सायवेन (पाच देवे), सारवेन (सहा देवे), येरवेन (सात देवे) असे समूह किंवा गट आहेत. त्यामुळे कुठल्याही आदिवासीला ''तू किती देवे आहेस?'' विचारा तो लगेच सांगेल की तो पाच देवे, सहा देवे इत्यादी आहे.
त्यात आणखी महत्त्वाची बाब म्हणजे आदिवासींच्या समसंख्येतील देव असलेल्याचं आपसात लग्न होत नाही. म्हणजे एखादा सहा देवे असेल तर दोन, चार, आठ देव असलेल्या म्हणजे सम संख्या असलेल्याशी त्याचं लग्न होऊ शकत नाही. त्याला तीन, पाच, सात, नऊ अशा विषम संख्या असलेल्याशी लग्न करावं लागेल. हे कशासाठी, याचा मी जेव्हा विचार केला तेव्हा लक्षात आलं, की एकाच रक्तात संबंध येऊ नयेत म्हणून पहांदी पारी कुपार लिंगो यांनी ही व्यवस्था निर्माण केली आहे. एकूणच अगदवासींच्या वैभवशाली संस्कृतीबद्दल पुढील भागात...
(पूर्वांर्ध)