Witch craft Violence : जादूटोण्याच्या संशयावरून ज्येष्ठ महिलेची धिंड; रेट्याखेडा गावातील चौघांना अटक
esakal January 19, 2025 01:45 PM

चिखलदरा : जादूटोण्याच्या संशयावरून ७७ वर्षांच्या महिलेला मारहाण करून लोखंडी सळईने चटके देण्यात आल्यानंतर तिची गावातून धिंड काढण्यात आली. हा संतापजनक प्रकार चिखलदरा तालुक्यातील रेट्याखेडा गावात घडला. या घटनेत पोलिसांनी शनिवारी चौघांना अटक केली.

चिखलदरा पोलिसांसह वरिष्ठ पोलिस अधिकारी आज गावात दाखल झाले. त्यांनी चौकशी करून चौघा संशयित आरोपींना ताब्यात घेऊन चिखलदऱ्यात आणले. त्यानंतर अटकेच्या प्रक्रियेला सुरवात झाली होती. संबंधित महिलेचा मुलगा व सुनेने जिल्हाधिकारी तसेच पोलिस अधीक्षकांकडे या घटनेची तक्रार केल्यावर कारवाईला वेग आला. रेट्याखेडा येथील ही ज्येष्ठ महिला ३० डिसेंबर २०२४ रोजी पहाटे चार वाजता प्रातर्विधीसाठी घराबाहेर पडल्या.

तेव्हा शेजारी राहणाऱ्या दोघांनी तिला पकडले व जादूटोण्याच्या संशयावरून मारहाण केली. त्यानंतर आणखी काही जण तेथे पोहोचले. त्यानंतर लोखंडी सळईने हातापायाला चटके देण्यात आले. त्यांना मिरचीची वाफ देऊन कुत्र्याचे व माणसाचे मूत्र पाजून डोक्यावर कापडाचे गाठोडे ठेवण्यात आले. चपलेचा हार घालून तोंडाला काळे ऑइल फासून गावात फिरविले. ‘तू गावात दिसली तर तुला जाळून टाकू,’ अशी धमकी या महिलेला देण्यात आली, असे पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी महिलेचा मुलगा व सून दुसऱ्या गावात कामासाठी गेले होते. त्यांना चार जानेवारीला या घटनेची माहिती मिळाली. चिखलदरा पोलिस ठाण्यात त्यांनी सहा जानेवारीला तक्रार दाखल केली. बाबू झापू जामुनकर (वय ४५), सायबू भुऱ्या चतुर (वय ३२), रामजी भुऱ्या चतुर (वर ४२) व साबूलाल तुंबा चतुर (वय ३२) यांना आज ताब्यात घेतले आहे.

मुंबईतून हलली सूत्रे

या गंभीर घटनेची तक्रार राज्य महिला आयोगाकडे केल्यानंतर विविध पातळ्यांवर देखील त्याची दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे मेळघाटपासून ते मुंबईपर्यंत हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची माहिती मागविली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.